खिचडी शिजवणारी महिला झाली करोडपती (व्हिडिओ)

File photo
File photo

अंजनगावसूर्जी (जि. अमरावती) : अंजनगावसूर्जी शहरातील श्रीमती पंचफूलाबाई हरणे विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून प्रेमाने खाऊ घालणाऱ्या बबिता सुभाष ताडे यांनी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. "कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमात करोडपती बनल्या आहेत. "करोडपती'चा हा भाग 18 व 19 सप्टेंबरला प्रसारित होणार आहे.

बबिता यांचे पती सुभाष ताडे गेल्या 23 वर्षांपासून येथील हरणे विद्यालयात शिपाई म्हणून काम करतात. बबिता ताडे या पदवीधर असून पदव्युत्तरचेही एका वर्षाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. काही दिवस त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून काही परीक्षा सुद्धा दिल्या. परंतु, कौटुंबिक जबाबदारी सांभाळता सांभाळता अभ्यासाची जागा संसाराने घेतली. मात्र पुस्तकावरचे प्रेम त्यांनी कमी होऊ दिले नाही. संसाराला हातभार लागावा म्हणून बबिताताईने सुद्धा पतीच्याच शाळेत खिचडी शिजविण्याचे काम स्वीकारले व ते काम त्या इमानेइतबारे पार पाडत आहे.

ताडे यांना एक मुलगी व एक मुलगा असून मुलगी पुण्याला व मुलगा अंजनगांव येथे शिक्षण घेत आहे. बबिताताईंना वाचनाची आवड असल्याने त्यांनी "कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्न केला. अकराव्या सिझनमध्ये सुरवातीला 32 लाख इच्छुक आले होते, त्यापैकी 4 हजार 800 स्पर्धक पात्र ठरले. ऑडीशनसाठी एकशेवीस स्पर्धक पात्र ठरल्यानंतर बबिताताई हॉट सीटवर आल्या.


 

अंजनगावात उत्साह
शहरातील कुणीतरी "कौन बनेगा करोडपती'मध्ये एक कोटी जिंकल्याची चर्चा अंजनगावात गेल्या अनेक दिवसांपासून होती. परंतु बबिताताईंनी आतापर्यंत कुणालाही ही गोष्ट सांगितली नव्हती. त्या "कौन बनेगा करोडपती'मध्ये खेळायला गेल्या होत्या, एवढीच गोष्ट चर्चेत होती. परंतु, आज अंजनगांव सूर्जी शहरातील अनेकांच्या वॉट्‌सअप ग्रुपवर बबिताताईंची व्हीडीओ क्‍लिप व्हायरल झाली आणि ही बाब अंजनगांव सूर्जी शहरातच वाऱ्यासारखी पसरली.

केवळ 1500 रुपये पगार
"करोडपती'चा मान मिळाल्याचे वृत्त पसरताच बबिताताईंना त्याबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. पण मिळालेल्या माहितीनुसार बबिताताईंचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. याचा अंदाज "करोडपती'च्या कार्यक्रमात अमिताभ बच्चनने विचारलेल्या प्रश्‍नानेच आला. अमिताभने बबिताताईंना विचारले की, त्यांना त्यांच्या कामाचा पगार किती मिळतो? त्यावर हसत बबिताताई उत्तरल्या - 1500 रुपये. पगाराचा हा आकडा ऐकून अमिताभ बच्चनही आश्‍चर्यचकित झाले व उत्सुकतेने त्यांच्या तोंडून शब्द निघाले - फक्त 1500 रुपये?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com