अवैध दारूविक्रेत्यांकडून महिलांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

  • गंगापूर झोपडपट्टीतील प्रकार; चार आरोपींना अटक
  • पोलिस ठाण्यावर धडकला मोर्चा
  • जुना वाद पुन्हा उफाळला

टाकळघाट (जि.नागपूर) ः येथील गंगापूर झोपडपट्टीमधील अवैध दारू विकणाऱ्यांनी झोपडपट्‌टीतील महिलांची छेडखानी करून मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. आकाश कारमोरे (वय 27), अंशुल संजय कारमोरे (वय 19), ऋषिकेश राजू डोंगरे (वय 23), अमित /निक्कू वामन कुडवते (वय 26, सर्व राहणार गंगापूर झोपडपट्टी) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी कारमोरे आणि डोंगरे यांचे अवैध दारूविक्री करतात.

गंगापूरमधील युवकांशी जुना वाद असल्याच्या कारणावरून मंगळवारी सर्व आरोपी सायंकाळी झोपडपट्टीमध्ये पोहोचले. पंकज सुखदेवे घरी हजर नसल्याने त्याच्या पत्नीने त्यांना अडविले. परंतु आरोपींचा आग्रह व आरडाओरड ऐकून शेजारील चंदा टेकोडे पुढे आल्या. आरोपींनी त्यांना शिवीगाळ व मारहाण करायला सुरुवात केली. एका मुलीला आरोपींनी शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार महिलांनी पोलिसांत दिली. शेजारी असलेले राजकुमार अहिरवार भांडण सोडवायला येताच त्यांच्या पत्नीला व त्यांना विटा व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. पोलिसांनी एका आरोपीस अटक केली व त्यास कोर्टाने जामीन दिला. त्याच्यासोबत असलेल्या अन्य आरोपीस पोलिसांनी सोडून दिले व तो आरोपी पुन्हा झोपडपट्टीमध्ये येऊन शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी देत असल्याने अंदाजे 100 गंगापूरवासींनी त्या आरोपींना अटक करा व त्यांची अवैध दारूची दुकाने त्वरित हटवा, या मागणीसाठी मोर्चा काढला. मोर्चाचा रोष पाहता बोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक आसिफ राजा शेख उपस्थित झाले. त्यांनी जमावाला शांत करून आरोपीस तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

"ती' दारूची अवैध दुकाने बंद करा
गंगापूर झोपडपट्टीत कित्येक दिवसांपासून अवैध दारूची दुकाने सुरू आहेत. त्यातील दारूविक्रेते कित्येक गुन्ह्यांमधील आरोपीसुद्धा आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कित्येक कारवाया केल्या तरी ती दुकाने बंद होत नाहीत. पोलिसांना न घाबरता खुलेआम अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास एखादी मोठी घटना घडायला वेळ लागणार नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women beat by illicit drug dealers