यशोगाथा... खादी कापडनिर्मितीतून महिला झाल्या स्वयंपूर्ण, कुणी साधली ही किमया

अतुल मांगे
Saturday, 19 September 2020

ग्रामप्रवर्तक ललित जामूनकर महात्मा गांधी यांची पावनभूमी असलेल्या वर्धेचे. गांधीजींच्या खादीची संकल्पना घेऊन चिरचाडी येथे खादी कापड व्यवसाय केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. गावात महिलांचे १५ बचत गट आहेत. या बचत गटांचा ग्रामसंघ तयार करून प्रत्येक बचत गटातील एका सदस्याला ग्रामसंघात सहभागी करून घेतले.

नागपूर : नक्षलवादाच्या सावटाखाली असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे राजकारण्यांचेही कायम दुर्लक्ष होते. त्यामुळे विकासाच्या नावे जिल्ह्यात बोंब असते. पारंपरिक शेती व्यवसायापलीकडे नागरिक काहीही करू शकत नाही. परंतु, कुरखेडा तालुक्यातील चिचखेडा येथील महिला याला अपवाद आहेत. खादी कापडनिर्मितीच्या माध्यमातून येथील महिला स्वयंपूर्ण झाल्या आहेत. कापडनिर्मिती आणि विक्रीच्या माध्यमातून दररोज चारशे ते पाचशे रुपयांची कमाई त्या करीत आहेत.

ग्रामप्रवर्तक ललित जामूनकर महात्मा गांधी यांची पावनभूमी असलेल्या वर्धेचे. गांधीजींच्या खादीची संकल्पना घेऊन चिरचाडी येथे खादी कापड व्यवसाय केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. गावात महिलांचे १५ बचत गट आहेत. या बचत गटांचा ग्रामसंघ तयार करून प्रत्येक बचत गटातील एका सदस्याला ग्रामसंघात सहभागी करून घेतले. गावात खादी कापड व्यवसाय केंद्राची पायाभरणी केली. खादी कापड निर्मितीतून महिला सक्षम झाल्या.

सविस्तर वाचा - सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय
 

कुरखेडा तालुका मुख्यालयापासून चिरचाडी गाव १३ किमी अंतरावर आहे. गावातील लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. खरीप व रब्बी हंगामातील मशागत केल्यानंतर महिलांच्या हाताला काम राहत नाही. गावात रोजगाराचे साधन नसल्याने महिलांना भटकंती करावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन ग्रामपरिवर्तक ललित जामुनकर यांना रोजगारनिर्मितीची संकल्पना सूचली. त्यांनी महिला बचत गटाचे ग्रामसंघ तयार करून प्रत्येक गटातील एका सदस्याला ग्रामसंघात सहभागी करून घेतले. गावात खादी कापड केंद्राची उभारणी केली.

कापड खरेदी केंद्रासाठी व्हीएसटीएफच्या वतीने सव्वा लाखांवर निधी उपलब्ध करून दिला. यातून कापड निर्मिती यंत्र आणि महिलांना कापड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सध्या गावात दोन हॅंडलूम (कर्गा मशीन) असून, यावर दररोज सात ते आठ महिला कापड तयार करतात. कापड तयार करण्यासाठी सूत वर्धेतून मागवले जाते. चिरचाडी येथे निर्मित कापडाला मोठी मागणी आहे. शासनाच्या उमेद अभियानाचे ग्रामविकास प्रकल्पाला सहकार्य असून, महिलांकडून निर्मित कापडाला मोठी मागणी आहे.

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत
 

‘निर्माणमुळे अंतर्बाह्य बदल’

दुर्लक्षित समाजघटकांसाठी काहीतरी करण्याच्या हेतूने ललिक जामुनकर यांनी गडचिरोलीची निवड केली. तिथे गेल्यानंतर निर्माणच्या सदस्यांशी भेट झाली. निर्माण आणि आपला मार्ग एकच असल्याचे लक्षात आले. निर्माणच्या शिबिरातून मिळालेल्या मार्गदर्शनातून ध्येयाची निश्चिती झाली. ग्रामविकास प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या ग्रामसंघांची निर्मिती झाली. हे सारे निर्माणमुळे साध्य झाल्याचे ललित जामुनकर सांगतात.

युवकांसाठी व्यायामशाळा, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम

युवकांसाठी व्यायामशाळा व विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळेत संगणक केंद्र सुरू करण्यात आले. व्यायामशाळेचा उपयोग पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी होत आहे. तर संगणक केंद्रामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळण्यास मदत होणार आहे.
 

इतर महिलांना प्रेरणादायी
चिरचाडी येथे महिला ग्रामसंघ तयार करण्यात आल्यानंतर या संघाचे कार्यालय सरू करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यामातून खादी कापड व्यवसाय केंद्राचे कामकाज चालविले जाणार आहे. बचत गटाच्या माध्यामातून रोजगारनिर्मिती करून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. चिरचाडी येथील केंद्रामुळे इतर गावांतील महिलांना प्रोत्साहन मिळून त्यासुद्धा स्वयंरोजगारासाठी प्रेरित होतील.
ललित जामुनकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women of Gadchiroli became self-sufficient through khadi production