हृदयद्रावक! शेतात काम करताना महिलांना अचानक दिसला तार; उचलताच संपूर्ण गावात पसरली शोककळा 

women had no more due to electric shock in Amaravati
women had no more due to electric shock in Amaravati

वरुड (जि. अमरावती)  : तालुक्‍यालगत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्‍यातील खलानगोद्री शेतशिवारातील एका शेतात भुईमूग निंदणाचे काम करीत असलेल्या दोन महिलांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. संबंधित शेतकऱ्याने वन्यप्राण्यांपासून संरक्षणाकरिता शेतातील कुंपणावर जिवंत विद्युत प्रवाह असलेला तार लावल्याचे सांगितले जाते.

अंबाडा येथील शेतकऱ्यांची शेती मौजा खलानगोद्री शेतशिवारात आहे. रविवारी (ता. 11) सकाळच्या सुमारास शेतातील भुईमुगाच्या पिकात निंदणाचे काम सुरू होते. त्याकरिता खलानगोद्री येथील पाच महिला निंदणाचे काम करण्याकरिता शेतात गेल्या, यापैकी 2 महिला समोर जात असताना कुंपणाशेजारी शेतात जाण्याच्या रस्त्यावर विद्युत तार पडलेला त्यांना दिसला. त्यांनी शेतात जाण्याकरिता विद्युत तार उचलला. त्याच वेळी या तारेमध्ये विद्युत प्रवाह वाहत असल्याने त्याचा शॉक लागला. यामध्ये कमला कुमरे (वय 52) व सुशीला दहिवाडे (वय 55) या दोन महिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्या मृत्युमुखी पडल्याचे लक्षात येताच त्यांच्या सोबत असलेल्या तीन महिलांनी गावामध्ये धूम ठोकली व गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली.

या परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ असल्याने शेतातील पिकांचे त्यांच्यापासून सरक्षण व्हावे म्हणून या परिसरातील शेतकरी रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाह असलेल्या तारा शेताच्या कुंपणावर टाकतात. याच प्रयोजनातून शेतकऱ्याने रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पिकाची नासधूस करू नये, यासाठी जिवंत विद्युत तारेला करंट लावून ठेवल्याचे सांगण्यात येते. 

घटनेची माहिती समजताच गावातील शेकडोंच्या जमावाने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान जलालखेडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार हरिश्‍चंद्र गावडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. मात्र शवविच्छेदनाकरिता मृतदेह नेण्यास मृतांचे नातेवाइक व गावकऱ्यांनी मज्जाव केला. यावेळी बेजबाबदारपणे मृत्यूस कारणीभूत असलेल्या शेतमालकास अटक करण्याची मागणी उपस्थित जमावाने केली. 

यावेळी घटनास्थळी दाखल झालेले काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव, नायब तहसीलदार विजय डांगोरे आदींनी उपस्थितांची समजूत काढली, त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com