वेळ सायंकाळ सातची, चितळ घरात शिरले अन् महिलेला जखमी केले; पुढे उडाला हा गोंधळ... 

संदीप रायपुरे
Thursday, 6 August 2020

अचानक चितळ घरात शिरल्याने महिला घाबरली. काही समजण्याच्या आत चितळाने महिलेला जखमी केले. गावकऱ्यांना माहिती मिळाली अन एकच गर्दी उसळली. महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. इकडे गावात चितळाला घरीच डांबण्यात आहे.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा गावात बुधवारी हा प्रसंग घडला. मध्य चांदाअंतर्गत येणारा गोंडपिपरी तालुका वनवैभवाने संपन्न आहे. या क्षेत्रात मानव वन्यजीवांचा संघर्ष नेहमीच चर्चेत राहिला आहे. यातून कधी वन्यजीवांची तर कधी मानवाजिवाची हानी झाली. बुधवारी रात्री घडलेल्या एका घटनेन पुन्हा हा विषय ऐरणीवर आला. वटराण्यातील निर्मला गेडाम ही साठवर्षीय महिला सायंकाळी घरी स्वयंपाकाची तयारी करीत होती. अचानक स्वयंपाकखोलीत चितळ घुसला. घाबरलेल्या चितळाने निर्मलास धक्का दिला. आणि पुढे... 

अचानक चितळ घरात शिरल्याने महिला घाबरली. काही समजण्याच्या आत चितळाने महिलेला जखमी केले. गावकऱ्यांना माहिती मिळाली अन एकच गर्दी उसळली. महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. इकडे गावात चितळाला घरीच डांबण्यात आहे. महिलेची प्रकृती बरी होईपर्यंत चितळाला न सोडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. नंतर वनविभागाचे कर्मचारी आले. पोलीसही पोहचले.

हेही वाचा - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...
 

तिच्या डोक्याला, कमरेला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. आजूबाजूंच्या लोकांना घटनेची माहिती होताच ते तिच्या घरी दाखल झाले. निर्मलाला गोंडपिपरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे गावातील नागरिकांनी त्या चितळाला घरात डांबले. घटनेची माहिती कळताच वनरक्षक संजय पेंदोर, फुलझेले, अविनाश हेपट, दत्ता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चितळाला सोडण्याची विनंती केली. पण, गावकरी मानायला तयार नव्हते. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा, अशी मागणी केली.

रात्री साडेबारा वाजता चितळाला सोडण्यात आले... 

प्रकार हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पीएसआय पटले चमूसह दाखल झाले. रात्री साडेदहा वाजता वनपरिक्षेत्राधिकारी गादेवार, वनपाल प्रफूल ढाले, निसर्ग सखा दीपक वांढरे पोहचले. यावेळी गावकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला, पण कुणी मानायला तयार नव्हते. निर्मला जोपर्यत ठीक होत नाही तोपर्यत चितळाला आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शेवटी रात्री साडेबारा वाजता चितळाला सोडण्यात आले. तब्बल सहा तास घरात बंद असलेल्या चितळाने सुटकेचा निश्वास टाकत जंगलाच्या दिशेने पळ काढला. 

 

असा निघाला तोडगा...

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने वनविभाग पुरता हतबल ठरला होता. अशावेळी शेवटी मुद्रांकावर निर्मलावरील उपचाराचा पूर्ण खर्च उचलणार असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी गादेवार यांनी लिहून दिले. त्यानंतर तोडगा निघाला. वन्यजिवांच्या हल्ल्यात जखमींना मदत मिळण्यास बराच विलंब होतो. कधीकधी तर वर्षानुवर्ष मदत मिळत नाही, हा पूर्वानुभव लक्षात घेता वटराण्यात हा प्रकार घडला.

 

दक्ष राहणे गरजेचे...

धाबा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत. वाघ, बिबट, अस्वल व अनेक दुर्मीळ प्राण्यांचे येथे वास्तव्य आहे. त्यांची सुरक्षा व मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याची मोठी जबाबदारी वनविभागावर आहे. वनपरिक्षेत्राधिकारी गादेवार यांनी याकडे अधिक सजगपणे लक्ष देण्याची गरज आहे.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women injured in spotted deer attack