ट्रकच्या धडकेत महिला ठार; पाटणसावंगी बायपासवरील घटना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पाटणसावंगीवरून बायपास रस्त्याने इटनगोटी येथे त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे पायी जात होत्या. बायपास रोडवर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ धापेवाडाकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने संगीता व वर्षा यांना धडक दिली.

पाटणसावंगी,(जि. नागपूर) : नोकरीवरून घरी पायी जात असलेल्या एका महिलेचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता पाटणसावंगी बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. संगीता गणपत भोयर (वय 40, रा. इटनगोटी, ता. सावनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. 

पाटणसावंगी आरोग्य केंद्रात आशा वर्कर असलेल्या संगीता या त्यांच्या नातेवाईक माजी सरपंच वर्षा सुधाकर भोयर यांच्यासोबत पाटणसावंगीवरून बायपास रस्त्याने इटनगोटी येथे त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे पायी जात होत्या. बायपास रोडवर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ धापेवाडाकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने संगीता व वर्षा यांना धडक दिली. यावेळी संगीता या ट्रकच्या पाठीमागच्या चाकात आल्याने चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाल्या. नागरिकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 

पलायनाच्या प्रयत्नात ट्रकचालक

येथे डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. नागरिकांनी पलायनाच्या प्रयत्नात असलेला ट्रकचालक दिनेश कुमार मेवाडा (रा. अकलेरा, जि. जलवारा, राजस्थान) यास काही अंतरावर पकडले. पोलिसांनी सावनेर येथील रुग्णालयामध्ये त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पाटणसावंगी पोलिस चौकीत ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास निशांत फुलेकर, कृष्णा जुनघरे करीत आहेत. 

टोल वाचविण्यासाठी बायपासचा वापर

सावनेर तालुक्‍यातील वाकी व गोसेवाडी रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून पाटणसावंगी मुख्य रस्त्यावरील टोल वाचविण्यासाठी अनेक ओव्हरलोड रेती ट्रक दररोज बायपासने ये-जा करीत असतात. यामुळे या रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. नागरिकांना या रस्त्यावरून चालणेही दुरापास्त झाले आहे. यामुळे या रस्त्यावरून होणारी जडवाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women killed in truck collision in Patansawangi