मातृत्वसुख अनुभवण्यापूर्वीच दगावल्या १,२२८ माता

केवल जीवनतारे
बुधवार, 15 मे 2019

प्रसूतीसाठी हवे स्वतंत्र आयसीयू
बाळंतपणादरम्यानची जोखीम हाताळण्यासाठी स्त्रीरोग प्रसूतिशास्त्रतज्ज्ञांकडे मोजकीच मिनिटे असतात. कधी कधी हा गोल्डन अवर पाच मिनिटांचा असतो. त्यामुळे ही गुंतागुंत सोडविण्यासाठी सरकारी रुग्णालयात स्वतंत्र अतिदक्षता विभाग, तांत्रिक मनुष्यबळ असणे आवश्‍यक असते. मेडिकल कॉलेजसह जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी स्वतंत्र अतिदक्षता वॉर्ड तयार करण्याची गरज आहे. तरच माता आणि नवजात शिशूंच्या मृत्यूला आवर घालणे शक्‍य आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञांनी नाव न  सांगण्याच्या अटीवर दिली.

गतवर्षीच्या तुलनेत माता मृत्यूंमध्ये वाढ - ‘व्हिजन २०२०’ हरवले; उपराजधानीत मातामृत्यूचे शतक
नागपूर - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे. दुर्धर आजारावरील उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्राला यश आले. हृदयापासून तर यकृताचे प्रत्यारोपण नव्हेतर गर्भाचेही प्रत्यारोपण करण्यात यश आले. मात्र, मातामृत्यूचा टक्का घटविण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला पाहिजे तसे यश आलेले नाही. राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी माता मृत्यूचा टक्का वाढला आहे. २०१८-१९ मध्ये १२२८ मातांना मातृत्वसुख अनुभवण्यापूर्वीच जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. उपराजधानीत मातामृत्यूने शतक गाठले.

आई होण्याइतकी आनंदाची गोष्ट महिलांच्या आयुष्यात नाही. परंतु, या सुखाचा आनंद  घेण्यापूर्वीच अनेक माता जगाचा निरोप घेतात. हे विदारक चित्र आजही आहे. मातामृत्यूने उपराजधानीत शतक पार केल्यानंतरही वैद्यकीय विश्‍लेषणाच्या पलीकडे कोणतीही उपाययोजना केली जात नाही.

गर्भवती असताना पोषण आहार, आरोग्य सेवांचा अभाव, प्रसूतीच्या वेळी अडचणी येतात. यातच शंभरापैकी साठ महिला रक्तक्षयग्रस्त असल्याचे आढळून येते. प्रसूती दरम्यान गुंतागुंत होऊन रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्राव मातामृत्यूस कारणीभूत ठरतो. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या काळात राज्यात १ हजार २२८ मातांचा मृत्यू झाला. पुणे येथील आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही नोंद करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियान अपयशी शासनातर्फे माता मृत्यू रोखण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजना, आदिवासी भागात नवसंजीवनी योजनांसह अनेक योजनांचा पाऊस पाडला जातो. विशेष असे की, ‘व्हिजन २०२०’ अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा करण्याचा कार्यक्रम आखला होता. तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाद्वारे कोट्यवधी रुपये माता व बालमृत्यू रोखण्यासाठी खर्च केले जात असतानाही गतवर्षीच्या तुलनेत ४४ माता यावर्षी जास्त दगावल्या आहेत. निश्‍चित केलेल्या उद्दिष्टांमध्ये ‘मातामृत्यू कमी करणे’ हे उद्दिष्ट सर्वांत प्रमुख आहे. अभियान चांगले आहे, परंतु अंमलबजावणीत कुठेतरी पाणी मुरते.

पथदर्शी प्रकल्पाचे काय झाले? 
पूर्व विदर्भात यावर्षी सुमारे २०० वर माता मृत्यू झाले आहेत. दरम्यान, अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या चमूकडून वर्धा जिल्ह्यात माता मृत्यू नियंत्रणाच्या पथदर्शी प्रकल्पावर काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्व विदर्भात राबवण्याचे प्रयत्न सुरू होते. या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत माता मृत्यू नियंत्रणासाठी अमेरिकेचे तज्ज्ञ मदत करणार होते. नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्याशी चर्चा केली. मात्र पुढे काय झाले, हे कळायला मार्ग नाही.

एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ -११८४ माता मृत्यू 
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ -१२२८ माता मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Mother Death Increase Health Care