भयानक! लग्नाचे आमिष दाखवून राजस्थानमध्ये होतेय महिलांची तस्करी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

 महिला व युवतींची तस्करी करणाऱ्या टोळीची साखळीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
गरीब कुटुंबातील विवाहित महिला किंवा युवतींना हेरून त्यांची राजस्थानमध्ये तस्करी करण्याची प्रक्रिया ही चार ते पाच टप्प्यांमध्ये चालत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.

अमरावती :  शहरातील गाडगेनगर हद्दीतील एक चार मुलांची आई असलेल्या महिलेस पैशाची गरज असल्याने ती स्थानिक एजंटच्या जाळ्यात अडकली. अपहरण करणाऱ्याने तिला अमरावती येथून दुसऱ्या राज्यात नेले. तेथे दुसरा एजंट भेटला, त्याच्याकडून अमरावतीच्या एजंटला काही रक्कम मिळाली. त्याने अमरावतीहून नेलेल्या महिलेचा ताबा दिला. मध्यप्रदेशातील एजंटने पुन्हा काही लोकांशी बोलणी करून तिला राजस्थानात नेले. तेथे तिचे लग्न लावले. परंतु कुणाशी? याबाबत गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सय्यद इमरानने अद्याप वाच्यता केलेली नाही.

या प्रकरणाचा तपास करतानाच महिला व युवतींची तस्करी करणाऱ्या टोळीची साखळीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
गरीब कुटुंबातील विवाहित महिला किंवा युवतींना हेरून त्यांची राजस्थानमध्ये तस्करी करण्याची प्रक्रिया ही चार ते पाच टप्प्यांमध्ये चालत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. शहरातील एका विवाहित महिलेच्या अपहरण व विक्री प्रकरणाचा तपास करणाऱ्या गाडगेनगर पोलिसांनी आता या मानवीतस्करी प्रकरणाची पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील गरीब महिला, युवतींना हेरणे, चांगल्या कुटुंबातील मुलाशी लग्नाचे आमिष दाखवून त्यांना परप्रांतात नेण्यासाठी तयार करणारा एक वर्ग सक्रिय आहे. त्यानंतर अमरावतीवरून दुसऱ्या राज्यातील व्यक्तीपर्यंत पोहोचवून देणारा स्थानिक एजंट, स्थानिक एजंटपासून विकत घेणारी तिसरी व्यक्ती असते, ती व्यक्ती जो लग्नासाठी इच्छुक असतो, त्याच्यापर्यंत महिला व मुलींना घेऊन जाते. जो लग्न करतो, तो मुख्य एजंटला व लग्न करणाऱ्या महिला किंवा युवतीस काही रक्कम देतो. ज्या अनोळखी व्यक्तीसोबत लग्न लावून संसार करण्यासाठी पाठविल्या जाते त्यापैकी फारच कमी व्यक्ती अशा महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देतात. त्यामुळे लग्न करणाऱ्या बऱ्याच महिलांपुढे गंभीर प्रश्‍न निर्माण होतात. त्यापैकी काही चुकीच्या मार्गाने जाण्यास बाध्य होतात. अशाप्रकारची ही मोठी साखळी महिला व युवतींच्या तस्करीप्रकरणात असते. त्यापैकी काहींना राजकीय व्यक्तींचेही पाठबळ असल्याने अशा घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा - शाळा सुरू पण घंटा वाजणार नाही

सखोल तपास सुरू
अमरावतीच्या न्यायालयाने सय्यद इमरानला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील दोघे राजस्थान येथील असल्याने त्यांच्या अटकेसाठी गाडगेनगर पोलिसांचे एक पथक राजस्थानला जाईल, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी स्पष्ट केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women trafficking in Amaravati