
अमरावती : दारू अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते. दारूचा मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास सर्वाधिक महिलांना होतो. म्हणून अलिकडे अनेक महिला जागरुक झाल्या असून संघटितपणे गावातील दारूविक्रीला विरोध करीत असतात. महिला शक्तीच्या प्रभावाने अनेक गावातील दारूवर निर्बंध आले आहेत. जिथे या महिलांनी चांगुलपणे सांगूनही त्यांची दखल घेतली जात नाही, तिथे त्यांनी दारू विक्रेत्यांना धारेवर धरल्याच्या घटनाही ऐकिवात आहेत.
जिल्ह्यातील नांदगावखंडेश्वर तालुक्यातील फुबगावात एक व्यक्ती अवैधरीत्या मद्यविक्री करीत असल्याचा आरोप करून गावातील काही महिलांनी त्याला धडा शिकविण्याच्या उद्देशाने चपलांचा प्रसाद दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने पळ काढला. फुबगावातील एका व्यक्तीला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही बाब पुढे आली. शनिवारी (ता. 25) सायंकाळी ही घटना घडली.
गावात काही दिवसांपासून देशी व गावठी दारू विक्री जोरात सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला. यासंदर्भात अनेकदा महिलांनी नांदगावखंडेश्वर पोलिस व तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. परंतु त्या मागणीचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्याने अनेक जण व्यसनाच्या आहारी गेले. बऱ्याच जणांचे कुटुंब त्यामुळे उद्ध्वस्त झाले. महिला व युवतींना होणारा त्रास वाढला. परंतु गावात उघडपणे सुरू असलेली अवैध मद्यविक्री कमी झाली नाही, असा आरोप फुबगावातील महिलांनी केला.
अवैध दारूविक्री करीत असल्याचा संशय घेऊन ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली, त्याच व्यक्तीच्या दुचाकीची महिलांनी तपासणी केली असता त्यात मद्य आढळले नाही. त्या युवकानेदेखील महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वातावरण तापत असल्याचे बघून काहींनी नांदगावखंडेश्वर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक फुबगावात दाखल झाले. तोपर्यंत ती व्यक्ती गावात आढळली नाही, असे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रियंका वासनिक यांनी स्पष्ट केले. ज्या महिलांनी आरोप केला त्यांनीही तक्रार नोंदवली नाही.
सविस्तर वाचा - अबब! या अभेद्य इमारतीचे वय 106 वर्षे?
तक्रार नोंदविली नाही
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस गावात पोहोचले. कुणीही तक्रार नोंदविण्यासाठी पुढे आले नाही. ज्याच्यावर संशय होता ती व्यक्तीही घटनास्थळी आढळली नाही.
प्रियंका वासनिक, प्रभारी पोलिस निरीक्षक नांदगावखंडेश्वर
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.