Yavatmal : समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्य करा : डॉ. भगतसिंह कोश्यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्य करा : डॉ. भगतसिंह कोश्यारी

समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्य करा : डॉ. भगतसिंह कोश्यारी

यवतमाळ : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची एकात्म मानवतावादात आस्था होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेत लोकप्रतिनिधींनी समाजातील गोरगरीब, पीडित, त्रस्त, वंचित व आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी कार्य करावे’, असे आवाहन राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनी केले. निळोणा येथील दीनदयाळ प्रबोधिनीत बुधवारी (ता. 24) आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला डॉ. कोश्यारी संबोधित करीत होते.

राज्याचे राज्यपाल महामहीम डॉ. भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या यवतमाळ दौर्‍यावर आहेत. शहरात आगमन होताच त्यांनी दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. प्रारंभी त्यांनी दीपप्रज्ज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. मंचावर राज्यपालांसह दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा ज्योती चव्हाण व सचिव विजय कद्रे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडकर यांनी दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. राज्यपाल डॉ. कोश्यारी पुढे म्हणाले की, ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अत्यंत साधे, पण तेवढेच महान व्यक्ती होते. त्यांची साधी राहणी, उच्चविचार व इंग्रजी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व प्रेरणादायी आहे. त्यांचे अर्थशास्त्रावरील विचार अंगीकारण्याची गरज आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून कार्यकर्त्यांनी, खासदार, आमदार व स्वयंसेवकांनी समर्पण भावनेतून समाजाच्या उत्थानासाठी कार्य करावे. श्रीमंत व गरिबांसाठी सारखेच योगदान द्यावे’, असे आवाहनही राज्यपाल डॉ. कोश्यारी यांनी केले.

याप्रसंगी विधान परिषदेचे सदस्य नीलय नाईक, यवतमाळचे आमदार मदन येरावार, राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे, केळापूरचे आमदार संदीप धुर्वे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान महिलांनी राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या आमदारांचे औक्षण केले. कार्यक्रमाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन परसोडकर यांनी संचालन केले. संस्थेच्या उपाध्यक्षा ज्योती चव्हाण यांनी आभार मानले.

राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण

निळोणा येथील दीनदयाळ प्रबोधिनीच्या प्रांगणात राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रबोधिनीच्या परिसराची पाहणी केली.

loading image
go to top