घाणीच्या सावटात विद्यार्थ्यांचे स्वागत!; झेडपीच्या दीड हजार शाळांत स्वच्छताकर्मीच नाहीत  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

workers are not available to clean ZP schools

शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वर्ग खोल्या बांधल्या. स्वच्छतागृहांची व्यवस्था केली. मात्र, यात स्वच्छता राखण्याचे काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम शिक्षक, विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहे.

घाणीच्या सावटात विद्यार्थ्यांचे स्वागत!; झेडपीच्या दीड हजार शाळांत स्वच्छताकर्मीच नाहीत 

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात यंदा शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली नाही. सध्या शिक्षक घरी, मंदिर, समाजमंदिरात विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळत आहे. राज्य शासनही शाळा सुरू करण्याबाबत प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत स्वच्छताकर्मीच नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांनाच श्रमदानातून शाळेची साफसफाई करावी लागण्याची शक्‍यता आहे.   

हेही वाचा - कंगणाला मिळालेली Y+ सुरक्षा असते तरी काय? Z+, Z, Y आणि X श्रेणीची सुरक्षा कुणाला कधी मिळते? वाचा

शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वर्ग खोल्या बांधल्या. स्वच्छतागृहांची व्यवस्था केली. मात्र, यात स्वच्छता राखण्याचे काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम शिक्षक, विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहे. शाळेत दाखल झाल्यानंतर शिक्षक हे काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सफाई करतानाचे चित्र जिल्ह्यातील बहुतांश शाळांत बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात एक हजार 570 शाळा आहेत. यातील दीड हजार शाळा प्राथमिक आहेत, तर 70 शाळा उच्च प्राथमिक आहे. 

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कॉन्व्हेंट उघडण्यात आले. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांकडे वळावे, यासाठी गेल्या काही वर्षांत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने अनेक शाळांत ई-लर्निंगची सुविधा करण्यात आली. यासह विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत बऱ्यापैकी विद्यार्थी प्रवेश घेऊ लागले आहेत. विविध सोयीसुविधा या शाळांना पुरविल्या जात असतानाच शाळांतील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. याउलट उच्च माध्यमिक शाळेत सफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्राथमिक शाळांत स्वच्छता कर्मचारीच नसल्याने सफाईची कामे शिक्षक, विद्यार्थ्यांना करावी लागत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता कर्मचारी नियुक्ती करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून सातत्याने करण्यात आली. शासनदरबारी हा मुद्दा लावून धरण्यात आला. मात्र, निधीचे कारण समोर करून हे पदच भरण्यात आले नाही. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. 

या परिस्थितीत शाळा, कॉन्व्हेंट बंदच आहे. पुढेमागे शाळा सुरू होऊ शकतात. तेव्हा साफसफाईची कामे विद्यार्थी, शिक्षकांनाच करावी लागतील का, असा सवाल शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लोखंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शाळांसाठी  सफाई कर्मचारी नाही. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळांतील साफसफाईची कामे करण्यात येतात.

क्लिक करा - 'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित

प्रत्येक शाळांसाठी स्वच्छता कर्मचारी गरजेचा आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे साफसफाईची कामे विद्यार्थी, शिक्षक श्रमदानातून करतात.
हरीश ससनकर,
राज्य सरचिटणीस महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती.

संपादन - अथर्व महांकाळ 

Web Title: Workers Are Not Available Clean Zp Schools

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chandrapur
go to top