
तेलंगणा, आंधप्रदेशातून मजुर आपल्याच खर्चाने सीमेपर्यंत आले. तिथून आपल्या गावी पोहोचण्यासाठी त्यांना खासगी वाहने भाड्याने करावी लागली. राजकीय पक्षांनी वाहन उपलब्ध करून दिले. परंतु मजुरांची संख्या बघता ती वाहनेही अपुरीच पडली. हाताचे काम गेले. थोडी रक्कम शेवटपर्यंत शिल्लक होती. तीही प्रवासात भाड्यात गेली. मजुरांना आणण्यासाठी आणि त्यांना पाठविण्यासाठी शासनाने पैसा उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे लोकांच्या सहकार्यानेच त्यांना गावापर्यंत पोहोचविले जात आहे,
चंद्रपूर : कोरोनाच्या टाळेबंदीत अडकलेल्या मजुरांना जगणे असह्य झाले आहे. अडचणींचा डोंगर त्यांच्या समोर उभा आहे. मात्र मदतीच्या नावावर दोन वेळेच्या जेवणाशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी जाण्याची मुभा केंद्र शासनाने दिली. मात्र यासाठी व्यवस्था केली नाही. त्यामुळे स्वखर्चानेच मजुरांना आपल्या गावी परतावे लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेले तीनशे मजुर नागपूर येथून रेल्वेने स्वखर्चाने जाणार आहेत.
अवश्य वाचा - एका चुकीमुळे नातेवाईकांना सहा दिवस करावी लागली अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा!
तेलंगणा, आंधप्रदेशातून मजुर आपल्याच खर्चाने सीमेपर्यंत आले. तिथून आपल्या गावी पोहोचण्यासाठी त्यांना खासगी वाहने भाड्याने करावी लागली. राजकीय पक्षांनी वाहन उपलब्ध करून दिले. परंतु मजुरांची संख्या बघता ती वाहनेही अपुरीच पडली. हाताचे काम गेले. थोडी रक्कम शेवटपर्यंत शिल्लक होती. तीही प्रवासात भाड्यात गेली. मजुरांना आणण्यासाठी आणि त्यांना पाठविण्यासाठी शासनाने पैसा उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे लोकांच्या सहकार्यानेच त्यांना गावापर्यंत पोहोचविले जात आहे, असे प्रशासन सांगत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या उत्तरप्रदेशातील 307 नागरिक त्यांच्या मुळ गावाकडे रविवारी रवाना झाले. त्यांच्या हाताला काम नाही. आता मदत करणारेही कुणी नाही. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नागपूरपर्यंत ते खासगी वाहनांनीच गेले. लोकवर्गणीतून त्यांच्यासाठी 25 वाहनांची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली. नागपुरातून विशेष रेल्वेने ते लखनऊकडे रवाना झाले. मात्र रेल्वेचे तिकीटही त्यांना स्वतःच काढावे लागले. त्यामुळे या मजुरांकडे असलेली थोडीबहुत शिल्लकही तिकीटांमध्ये खर्च झाली. या विशेष रेल्वेमध्ये चंद्रपूर तालुक्यातील 84, राजुरा 22, भद्रावती 18, मुल 47, गोंडपिंपरी 29, गडचांदूर 12, सावली 10, जिवती 13, वरोरा 2 व बल्लारपूर येथील 70 अशा एकूण 307 मजुरांना रवाना करण्यात आले. यामध्ये 289 मजुरांचा समावेश होता. त्यांची मुले पकडून हा आकडा 307 झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे कोरोनासाठी मदत म्हणून लाखो रुपयांचा निधी जमा झाला आहे. हा निधी प्रशासन मजुरांसाठी खर्च का करत नाही? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.