esakal | या गावाने केले संकटाचे संधीत रुपांतर, लॉकडाऊनमध्ये दिले दीड हजार मजुरांना काम
sakal

बोलून बातमी शोधा

Workers got employment in  hometown during lockdown

लाखांदूर तालुक्‍यातील गौण खनिज संपत्तीने नटलेल्या चप्राड गावातील मजूर कधीकाळी येथील पहाडीवर दगड, गिट्टी फोडण्याचे काम करायचे. पुढे हे काम बंद पडल्याने गावातील अनेक कुटुंब कामाच्या शोधात स्थलांतर करू लागले. गेल्या अनेक वर्षांपासून कामासाठी स्थलांतर अशी परंपराच येथे सुरू झाली. गावातील सुमारे 100 पेक्षा अधिक कुटुंबातील एक हजार मजूर दरवर्षी परजिल्ह्यात व परराज्यात कामासाठी जातात.

या गावाने केले संकटाचे संधीत रुपांतर, लॉकडाऊनमध्ये दिले दीड हजार मजुरांना काम

sakal_logo
By
विश्‍वपाल हजारे

लाखांदूर (जि. भंडारा) : कुटुंबाच्या पालनपोषणासाठी अनेक वर्षांपासून परजिल्ह्यात कामासाठी जाणाऱ्यांना सध्या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. अशा कुटुंबांना चप्राड ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे मग्रारोहयोचे काम उपलब्ध झाले आहे. गावात शिवारात दीड हजारांहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला असून, यावर्षी कामासाठी स्थलांतराची परंपरा खंडित झाली आहे. गावातच काम मिळाल्याने मजूर समाधानी आहेत, सोबतच गावाच्या परिसरातील अडलेली कामेही पूर्णत्वास येण्याची आशा निर्माण झाली आहे.

Video : शेतक-यांच्या पांढ-या सोन्याला मिळतोय मातीमोल भाव; एका शेतक-याने व्यथा मांडली गीतातून...

लाखांदूर तालुक्‍यातील गौण खनिज संपत्तीने नटलेल्या चप्राड गावातील मजूर कधीकाळी येथील पहाडीवर दगड, गिट्टी फोडण्याचे काम करायचे. पुढे हे काम बंद पडल्याने गावातील अनेक कुटुंब कामाच्या शोधात स्थलांतर करू लागले. गेल्या अनेक वर्षांपासून कामासाठी स्थलांतर अशी परंपराच येथे सुरू झाली. गावातील सुमारे 100 पेक्षा अधिक कुटुंबातील एक हजार मजूर दरवर्षी परजिल्ह्यात व परराज्यात कामासाठी जातात.
यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या मजुरांना स्थलांतर करता आलेच नाही. येथील मजुरांपुढे कुटुंबाच्या पोषणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीचे संकट आले. त्यावर मात करण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन मग्रारोहयोचे काम मंजूर केले. तीन ठिकाणी भातखचऱ्याचे काम सुरू झाले असून जवळपास एक हजार 536 मजूर कामावर आहेत. या कामावरील सर्व महिला-पुरुष मजुरांना शासन निर्देशानुसार तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच मातीकाम करावे लागत आहे.
वर्षानुवर्षे कामाच्या शोधात गावकऱ्यांनी स्थलांतराची परंपरा जोपासली आहे. ती यावर्षी खंडित झाली. पण, गावातच काम मिळाल्याने मजुरात आनंदाचे वातावरण आहे. सदर मातीकाम सरपंच कुसुम दिघोरे, उपसरपंच गोपाल घाटेकर व रोजगार सेवक बगमारे व ग्रामपंचायत प्रशासनाच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

काम देता आल्याचा आनंद

लॉकडाऊनमुळे गावातील मजूरवर्गाला काम नव्हते. तसेच अधिकाऱ्यांकडूनही रोहयोची कामे सुरू करण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. ही समस्या सामाजिक संघटनेचे अविल बोरकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात मांडण्यात आली. त्यानंतर गावात मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यात आले. आता भातखाचऱ्याचे काम सुरू असून एक हजार 637 मजुरांना रोजगार मिळाला आहे. गावातील मजुरांना काम उपलब्ध करून देता आले याचा आनंद आहे.
-गोपाल घाटेकर, उपसरपंच, ग्रामपंचायत चप्राड

गावातच मिळताहेत पैसे
खिशात पैसे व हातात काम नाही ही मजूरासाठी सर्वांत वाईट अवस्था असते. काम करून दोन पैसे जमवले तर, पावसाळ्यात पोट भरता येते. लॉकडाउनमुळे कामाला जाता येत नसल्याने संकटच आले होते. मात्र, ग्रामपंचायतीने नियोजन करून मग्रारोहयोचे काम सुरू केले आहे. यामुळे गावातच दोन पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
-कैलास रामदास चौधरी
रोहयो मजूर, चप्राड.