"जय सेवा'च्या गगनभेदी गर्जनेने दुमदुमला अवघा जिल्हा

खुशाल ठाकरे
Monday, 10 August 2020

गडचिरोलीपासून जवळच असलेल्या पोटेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत जागतिक मूलनिवासी (आदिवासी) दिन साजरा करण्यात आला. पंचायत समिती सदस्य मालता मडावी यांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले.

गडचिरोली : ९ ऑगस्ट हा देशासाठी जसा क्रांतिदिन आहे तसाच हा दिवस जगभरात आदिवासीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाही रविवारी (ता. ९) जिल्हाभरात "जय सेवा'ची गगनभेदी गर्जना करत आदिवासी बांधवांनी हा दिवस उत्साहात साजरा केला.

गडचिरोलीपासून जवळच असलेल्या पोटेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत जागतिक मूलनिवासी (आदिवासी) दिन साजरा करण्यात आला. पंचायत समिती सदस्य मालता मडावी यांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ब्राह्मणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश चिकणे, गडचिरोली तालुका ग्रामसभा महासंघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नरोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शालिक पोटावी, पोलिस पाटील किशोर नरोटे उपस्थित होते. गडचिरोली तालुक्‍यातील चांदाळा येथे आदिवासी समाजाच्या वतीने धार्मिक ध्वज फडकविण्यात आला. कार्यक्रमाला हिरामण कुमरे, राजेंद्र मेश्राम, मोरश्‍वर कोराम, रामभाऊ कुमरे, अक्षय कोराम, हेमंत ढोक, ज्ञानेश पेंदाम व नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ऑगस्ट क्रांतिदिन व जागतिक आदिवासीदिन साजरा करण्यात आला. गडचिरोली येथील क्रांती स्तंभाजवळ क्रांतिवीरांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच जागतिक आदिवासीदिनानिमित्त क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा सचिव संजय कोचे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. देविदास मडावी, डॉक्‍टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनायक मसराम, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दादा चोधरी, सरचिटणीस नितीन खोब्रागडे, कोषाध्यक्ष कबीर शेख, सुलोचना मडावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

एटापल्ली येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नंदू मट्टामी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, सरपंच प्रशांत आत्राम, केशव कुडयेटी, दामा नरोटी, उलगे तिम्मा, सुधाकर गोटा, कोत्तू पोटावी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक रैजू मडावी व संचालन संजय सडमेक यांनी केले. कुरखेडा येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमा फेडरेशनचे कार्याध्यक्ष तिमेश्‍वर कोरेटी यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वज फडकवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष ए. बी. मडावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी हलबाहलबी समाज संघटनेचे अध्यक्ष शालिक मानकर, सुधाकर उईके, श्रीहरी सयाम, रामाजी किरंगे तसेच ४५ जमातीमधील आदिवासी समाजबांधव उपस्थित होते. झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुनीता नामनवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विशाल राजूरवार, प्रतिभा मिरासे, दादाजी पेंदाम, भगवान मडावी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

रॅलीद्वारे प्रबोधन
एटापल्ली तालुक्‍यात जागतिक आदिवासीदिन विविध सांस्कृतिक, सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. कसनसूर येथील वेनासर चौकात वेनहारा व तोडसा इलाखा पट्टीच्या वतीने जागतिक आदिवासीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅली काढून समाजप्रबोधन करण्यात आले.
संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World MulNivasi day celebrated in Gadchiroli