यशोमती ठाकूर म्हणाल्या, नियम न पाळणाऱ्यांवर धडक कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

राज्यातील अर्थव्यवस्थेत सुधारणांच्या दृष्टीने काही प्रमाणात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली. उद्योग- व्यवसायांना परवानगी दिली. पण याचा अर्थ लॉकडाउनमधून मोकळीक मिळाली असे नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व इतर दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. लॉकडाउनच्या अंमलबजावणीत जराही कुचराई होता कामा नये. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. निष्कारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारी दुकाने यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे.

अमरावती : कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी लॉकडाउनची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, असे सांगत नियम न पाळणाऱ्यांवर यंत्रणांनी अधिक धडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी (ता.21) दिले.
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बाबींचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

राज्यातील अर्थव्यवस्थेत सुधारणांच्या दृष्टीने काही प्रमाणात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली. उद्योग- व्यवसायांना परवानगी दिली. पण याचा अर्थ लॉकडाउनमधून मोकळीक मिळाली असे नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व इतर दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. लॉकडाउनच्या अंमलबजावणीत जराही कुचराई होता कामा नये. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. निष्कारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारी दुकाने यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे.

अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. पोलिस आणि प्रशासनाने कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे. लॉकडाउन संपवून सर्वांची सुरक्षितता व विकास साधायचा असेल तर ही साथ रोखणे आवश्‍यक आहे. जिल्ह्याच्या सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत. बाहेरून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये, याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेकदा लक्षणे दिसत नाहीत. पण त्या व्यक्ती इतर ठिकाणी जाऊन संसर्ग पसरवू शकतात. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्‍यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

अवश्य वाचा - कॅन्सरग्रस्त चिमुकलीवर शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांचा खर्च; बाप झाला हतबल...मदतीचे आवाहन

कोरोना साथ संपविण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. स्वत: कुठलीही दक्षता न पाळता इतरांचे आरोग्य धोक्‍यात घालणाऱ्या व्यक्तींवर वेळेत कारवाई व्हावी. कायद्याचा धाक निर्माण करावा. सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून कायदा व सुव्यवस्था राखावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलिस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलिस अधीक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yashomati thakur ordered to take action against rule breakers