कॅन्सरग्रस्त चिमुकलीवर शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांचा खर्च; बाप झाला हतबल...मदतीचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पुढील अडीच वर्षांच्या उपचारासाठी पाच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याने मलमकर कुटुंबाच्या डोक्‍यावरील आकाशच फाटले. किमोसह तीन हजारांचे इंजेक्‍शन नियमित द्यावे लागते. तिच्यावर बोन मॅरोची शस्त्रक्रिया करायची आहे. त्याकरिता वडिलांची पैशासाठी धडपड सुरू आहे.

नागपूर : कोरोनाच्या संकटकाळात अनेक अकल्पित अशा घटना घडत आहेत. मानवी संवेदना बोथड ठरविणारी घटना उपराजधानीतील एका कॅन्सरग्रस्त चिमुकलीवर उपचाराच्या निमित्ताने पुढे आली. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरांवरून प्रयत्न करूनही मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही. यामुळे हतबल वडिलांची एकाकी धडपड सुरू आहे. समाजातील दानशूरांनी या कठीण वेळेत मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

तन्वी रसिक मलमकर असे कॅन्सरग्रस्त सहा वर्षीय मुलीचे नाव आहे. दिघोरीतील राऊतनगरात वास्तव्यास असणाऱ्या तन्वीचे वडील रसिक मलमकर मेकॅनिक आहेत. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. एकुलत्या एक मुलीला ब्लड कॅन्सरचे निदान होताच वडिलांच्या पायाखालची वाळू घसरली. त्यांनी हिंमत बांधून मुलीला जगविण्याचा चंग बांधला.

हेही वाचा : अधिकाऱ्याने टाकला व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मॅसेज...जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस 

दिवसरात्र एक करीत मुलीच्या जिवासाठी त्यांनी आजवर दोन ते सव्वादोन लाखांचा खर्च केला. डॉ. सुशील मानधनिया यांच्याकडे तन्वीवर उपचार सुरू आहेत. डॉक्‍टरांनीही जमेल ती मदत केली. पण, पुढील अडीच वर्षांच्या उपचारासाठी पाच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याने मलमकर कुटुंबाच्या डोक्‍यावरील आकाशच फाटले. किमोसह तीन हजारांचे इंजेक्‍शन नियमित द्यावे लागते. तिच्यावर बोन मॅरोची शस्त्रक्रिया करायची आहे. त्याकरिता वडिलांची पैशासाठी धडपड सुरू आहे.

अडचणीच्या काळात दानशूरांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अलाहाबाद बॅंकेच्या हुडकेश्‍वर शाखेत 50292464852 हा खाते क्रमांक तर ALLA0213185 आयएफएससी कोड आहे. 8208999893 हा रसिक मलमकर यांचा मोबाईल क्रमांक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A father struggle for a daughter with cancer