esakal | बच्चू कडूंवर यशोमती ठाकुरांचं पॅनेल भारी, जिल्हा बँकेवर 'सहकार'चा झेंडा
sakal

बोलून बातमी शोधा

yashomati thakur bachhu kadu

बच्चू कडूंवर ठाकुरांचं पॅनेल भारी, जिल्हा बँकेवर 'सहकार'चा झेंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (amravati district bank election 2021) पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur), जिल्हापरिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख तसेच माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या सहकार पॅनेलने पुन्हा बाजी मारली. सहकार पॅनेलने सर्वाधिक १२ जागांवर विजय मिळवून आपला दबदबा कायम राखला. तर, राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) हे स्वतः विजयी झाले, मात्र, त्यांच्या परिवर्तन पॅनेलला चारच जागांवर समाधान मानाले लागले. एका अपक्षाने या निवडणुकीत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे दोन आमदारांना या निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातसुद्धा आपला दबदबा कायम असल्याचे या निमित्ताने दाखवून दिले.

हेही वाचा: अमरावती जिल्हा बँक निवडणूक : बबलू देशमुखांना धक्का, बच्चू कडू विजयी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांपैकी चार संचालक अविरोध आल्याने १७ जागांसाठी मतदान झाले. मतमोजणी मंगळवारी (ता.५) गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात पाड पडली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरलेल्या चांदूरबाजार सेवा सोसायटी मतदार संघातून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बबलू देशमुख यांचा पराभव केला. दुसरीकडे ओबीसी मतदारसंघातून बबलू देशमुख यांनी परिवर्तन पॅनेलचे मुख्य प्रवर्तक संजय खोडके यांचा पराभव केला. चांदूररेल्वे सेवा सहकारी सोसायटीमधून माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी २१ मते मिळवून परिवर्तन पॅनेलचे किशोर कडू यांचा पराभव केला.

दर्यापूर सोसायटीमधून आमदार प्रकाश भारसाकळे यांचा सुधाकर भारसाकळे यांनी पराभव केला. महिला राखीव मतदार संघातून सुरेखा ठाकरे व मोनिका वानखडे (मार्डीकर) विजयी झाल्या. तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून पुरुषोत्तम अलोणे, अनु.जाती जमाती मतदारसंघातून बळवंत वानखडे, मोर्शीतून चित्रा डाहाणे, चिखलदऱ्यातून दयाराम काळे, अंजनगावसुर्जी येथून अजय मेहकरे, अमरावतीतून सुनील वऱ्हाडे, भातकुलीतून हरिभाऊ मोहोड, धामणगांवरेल्वे मतदारसंघातून श्रीकांत गावंडे, तर अचलपूर सोसायटी मधून अनंत काळे विजयी झाले.

चार संचालक अविरोध -

माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, अभिजित ढेपे, सुरेश साबळे व जयप्रकाश पटेल हे आदीच अविरोध निवडून आले आहेत.

loading image
go to top