
यवतमाळ : शेतविक्रीवरून बापलेकीत राडा
आर्णी : आजारी वडिलांच्या उपचारासाठी विधवा मुलीने बचतगटाकडून एक लाख रुपये कर्ज काढून आजारावर खर्च केले. वडील साडेचार एकर शेती विकत असल्याची माहिती मुलीला मिळाली. तहसील कार्यालय गाठून मुलीने वडिलांकडे पैशांची मागणी केली असता दोघांत मारहाण झाली. बुधवारी दुपारी येथील तहसील कार्यालयात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली.
विधवा महिला वाशीम जिल्ह्यातील सारशी येथील तर वडील कोठाला येथील रहिवासी आहेत. वडिलांची येरमल हेटी येथे साडेचार एकर शेती आहे. सदर मुलगी विधवा असून, तिला तीन अपत्ये आहेत. मोलमजुरी करून मुलांना जगवते. अशातच काही महिन्यांपूर्वी वडील आजारी पडले. मुलीला याची माहिती मिळताच तिने बचतगटाकडून एक लाख रुपये कर्ज काढून उपचारावर खर्च केलेत.
वडील आजारातून बरे होताच त्यांनी शेतीविक्रीचा घाट घातला. शेतीविक्रीसाठी वडिलासह नातेवाईक तहसील कार्यालयात आले. याची माहिती मुलीला मिळताच तीदेखील आली. मुलीने शेतीविक्रीनंतर माझे एक लाख रुपये परत करा, अशी मागणी केले. त्यातून दोघांत वाद होत वडिलांनी मुलीला मारहाण केली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणाची कुठलीही तक्रार आर्णी पोलिस ठाण्यात देण्यात आलेली नव्हती.