esakal | कापसाचे दरही पाच हजारांवर; शेतकरी अडचणीत | Yavatmal
sakal

बोलून बातमी शोधा

 शेतकरी

Yavatmal: कापसाचे दरही पाच हजारांवर; शेतकरी अडचणीत

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : कापसात १२ टक्के पेक्षा जास्त ओलावा असल्याचे कारण देत खासगी बाजारात कापसाचे दर पाडण्यात आले आहेत. सध्या कापसाचे दर हमीभावापेक्षाही खाली आल्याने त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे पावसाच्या तडाख्यातून शेतकरी काही प्रमाणात वाचला असला तरी आता कापसाचेही भाव पडल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामातील कापूस खरेदीसाठी शासनाकडून गेल्या महिन्यात तयारीचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरा ६.४४ टक्क्यांनी घटला आहे. जास्त पावसामुळे काही भागात कापसाचे बोंडं काळे पडले असले तरी पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. कापसाला खासगी बाजारात दर चांगले असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

हेही वाचा: कात्रज : अल्प उत्पन्नधारकांसाठी लसीकरण मोहिम

मात्र, काही दिवसांत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. पहिल्या कापसात ओलावा जास्त आहे. त्यामुळे खासगी बाजारात आठ हजारांवर असलेले कापसाचे दर पाच हजारांवर आणण्यात आले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कापसात ओलावा असला तरी शेतकरी कापूस वाळवून तो विकण्यासाठी बाजारात आणत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत दर पाडल्याचे आता बोलल्या जात आहे.

शासनाने खरेदीबाबत नोव्हेंबरमध्ये केंद्र सुरू करण्याची सूचना यापूर्वी केली होती. कापूस पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी शक्य नसल्याचे सांगितले होते. अजूनही खरेदीबाबत स्पष्ट धोरण ठरलेले नाही. त्यामुळे पैशाची गरज असलेले शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. त्याचाच फायदा घेत खासगीत कापसाचे दर पाडण्यात आले आहे.

हेही वाचा: Samantha |"ते म्हणतात माझं अफेअर होतं, मी गर्भपात केला"

सोयाबीनला सुरूवातीला अकरा हजार रूपयांपर्यंत दर मिळाला होता. शेतकऱ्यांचे सोयाबीन जसजसे घरात येत गेले, तसतसे बाजार भाव कमी होत गेला. सध्या सोयाबीनचे दर हमीभावाच्या बरोबरीत आले आहे. यातच आता कापूस पिकाचा समावेश झाला असून कापसाचे दर साडेतीन ते चार हजाराने कमी झाले असून पाच हजारांवर प्रति क्विटंलचा भाव आहे.

पणनच्या बैठकीला मुहूर्ताची प्रतीक्षा कापूस खरेदीबाबत धोरण तसेच केंद्र निश्‍चितीसाठी पणन महासंघाची बैठक आतापर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे पणनच्या संचालक मंडळांच्या बैठकीकडे दुर्लक्ष झाले. आता दसऱ्यानंतर बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत पणन केंद्र सुरू करण्याची तारीख निश्‍चित करीत नाही, तोपर्यंत आणखी काही दिवस कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे.

loading image
go to top