
आयडी पासवर्डचा दुरूपयोग; रोखपालाने बँकेला लावला दोन लाखांचा चुना
यवतमाळ : स्वत:च्या फायद्यासाठी बँकेतील व्यवस्थापकांचा आयडी व पासवर्डचा दुरूपयोग करून बँकेला दोन लाखांने चुना लावणार्या तत्कालीन रोखपालावर येथील अवधुतवाडी पोलिस ठाण्यात ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना चैतन्य अर्बन क्रेडीट को- ऑपरेटिव्ह बँकेत गेल्या चार जानेवारीला उघडकीस आली. याबाबत काल शुक्रवारी (ता.28) तत्कालीन रोखपाल तथा एजन्ट शुभम रणखांबे (वय 28, रा. तंबाखे ले-आऊट, उमरसरा, यवतमाळ) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Yavatmal Crime News)
याप्रकरणी व्यवस्थापक संगीता ठाकरे (रा. तंबाखे ले-आऊट, उमरसरा, यवतमाळ) यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चैतन्य अर्बन क्रेडीट को-ऑपरेटिव्ह बँकेत शुभम रणखांबे हा रोखपाल (कॅशिअर) तथा एजंट म्हणून काम करीत होता. बँकेचे ग्राहक रज्जाक दुंगे याने 500 रुपये रोजचे डेली खाते 25 डिसेंबर 2018 रोजी शुभम रणखांबे याच्याकडे उघडले होते. त्यानंतर 21 जानेवारी 2019पर्यंत दुंगे यांच्या बँकेत आठ हजार रुपये जमा झाले होते. यावेळी रज्जाक दुंगे याने एक लाखाचे कर्ज घेतले. त्यानंतर दुंगे डेली पुस्तकात नेहमी भरणा करीत होता. त्यामुळे त्याला वारंवार ठेव तारण कर्ज डेलीच्या पुस्तकावर देण्यात येत होते. ती रक्कम डेली खात्यात वर्ग होत होती.
हेही वाचा: प्राचार्यांचे स्पष्टीकरण! "डाएट'कडे डिसले गुरुजी फिरकलेच नाहीत
दरम्यान, एकूण कर्ज रक्कम व्याजासहीत सहा लाख दोन हजार 826 रुपये 31 डिसेंबर 2021पर्यंत झाली होती व त्याने तीन लाख 99 हजार 280 रुपयांचा भरणा केला. त्याकडे दोन लाख तीन हजार 546 रुपये ठेव तारण कर्ज रक्कम बाकी होती. त्यामूळे गेल्या चार जानेवारीला व्यवस्थापक संगिता ठाकरे यांनी रज्जाक दुंगे यांच्या खात्याची तपासणी केली. यावेळी डेलीचे खाते व कर्जाचे खाते यामध्ये मोठी तफावत आढळून आली. ही बाब व्यवस्थापक यांनी थेट अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली.
त्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी शुभम रणखांबे याला बँकेच्या मुख्य शाखेत बोलावून विचारपूस केली. त्यावेळी रणखांबे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पाटील यांनी रज्जक दुंगे याच्यासोबत चौकशी केली असता, शुभम रणखांबे हा नेहमी ठेवीचे पैसे घेवून जात असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून रोखपाल (कॅशीअर) तथा एजंट असलेल्या शुभम रणखांबे याने चक्क व्यवस्थापक यांच्या आयडी पासवर्डचा दुरुपयोग करून स्वत:च्या फायद्याकरिता बँकेची दोन लाख तीन हजार 546 रूपयाने फसवणूक केल्याचे निश्पन्न झाले.
हेही वाचा: रोख पैसे नाहीत, धनादेश घ्या! सोलापूर बाजार समितीतील अडत्यांचा नियम
या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवधुतवाडी पोलिस करीत आहे.
Web Title: Yavatmal Crime News Bank Looted
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..