"कड्डम फॉल्ट'मुळे जाणवले भूकंपाचे धक्के

राजकुमार भीतकर
मंगळवार, 2 जुलै 2019

यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्यातील सीमावर्ती भागात 21 जून रोजी रात्री 9.12 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तेव्हापासून लोकांच्या मनात पुन्हा भूकंप तर होणार नाही ना, अशी अनामिक भीती निर्माण झाली आहे. परंतु, या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे जमिनीच्या भूगर्भरचनेत कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत. तसेच भूगर्भातील खडकांमध्ये घर्षणही झाले नाही. त्यामुळे पुन्हा भूकंपाचे धक्के बसण्याची शक्‍यता नाही, असे मत भू-वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.

यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्यातील सीमावर्ती भागात 21 जून रोजी रात्री 9.12 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तेव्हापासून लोकांच्या मनात पुन्हा भूकंप तर होणार नाही ना, अशी अनामिक भीती निर्माण झाली आहे. परंतु, या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे जमिनीच्या भूगर्भरचनेत कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत. तसेच भूगर्भातील खडकांमध्ये घर्षणही झाले नाही. त्यामुळे पुन्हा भूकंपाचे धक्के बसण्याची शक्‍यता नाही, असे मत भू-वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व विदर्भातील यवतमाळ या तीन जिल्ह्यांना 21 जूनला भूकंपाचे सौम्य धक्के बसले. अमरावती जिल्ह्यातील पार्डी येथील प्रयोगशाळेत केलेल्या नोंदीनुसार 3.7 रिश्‍टर स्केल व नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भूकंपमापक केंद्रावरील रिश्‍टर स्केलवर 3.9 मॅग्निट्यूट एवढी धक्‍क्‍यांची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. तर, भूकंपाचा केंद्रबिंदू पार्डीपासून 160 किलोमीटर, तर नांदेडपासून 95 किलोमीटर अंतरावर दाखविण्यात आला. नागपूर येथील भू-वैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भूकंप रिश्‍टर स्केलवर 3.4 मॅग्निट्यूट स्केलचा होता. भूकंपाचा कालावधी तीन सेकंदांचा असून एकच सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे भूगर्भरचनेत कोणतेही मोठे बदल किंवा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा भूकंपाचा धक्का बसण्याची शक्‍यता नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू हा तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आदिलाबादपासून 15 किलोमीटर अंतरावरील इंद्रवेली या गावांत होता. विदर्भ व मराठवाडा हे भूकंपप्रवण क्षेत्र नाही. भूपृष्ठावरील "कड्डम फॉल्ट'मुळे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जमिनीच्या आत खडकांतील भेगेमुळे (कड्डम फॉल्ट) धक्के जाणवल्याचे निरीक्षण भूगर्भशास्त्रांनी नोंदविले आहे.
भूकंपाच्या घटनेपासून हिंगोली जिल्ह्यातील हिमायतनगर, किनवट, नांदेड जिल्ह्यातील माहूर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव, आर्णी, घाटंजी, दारव्हा आदी तालुक्‍यांतील लोकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. विदर्भात प्रथमच भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी मराठवाड्यातील लातूर सोडले तर कोठेही भूकंपाचे धक्के बसले नाहीत.
काय आहे कड्डम फॉल्ट...
माणसांचा व दगडांचा इतिहास बघितला तर मानवाच्या निर्मितीच्या लाखो वर्षांपूर्वी दगडांची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्राचे पठार हे काळ्या दगडांचे बनलेले आहे. दोन दगडांमध्ये एक भेग असते. तेलंगणातील कड्डम व गोदावरी नदीच्या खोऱ्यातील भूगर्भातील अशीच एक भेग पेनगंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत आहे. तिलाच "कड्डम फॉल्ट' असे म्हटले जाते. ही भेग खूप लांब व खोल असते. ती जेथे असते, त्या भूगर्भात आत काही हालचाल झाल्यास अशा भेगेत लहरी तयार होतात व भूकंपाचे धक्के जाणवतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal Earthquake