esakal | यवतमाळ : फल्ड लाईट’ने लखलखणार नेहरू स्टेडीयम
sakal

बोलून बातमी शोधा

stadium

यवतमाळ : 'फल्ड लाईट’ने लखलखणार नेहरू स्टेडीयम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरातील जवाहरलाल नेहरू जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट गेल्या दोन वर्षांत झाला आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. यात आता ‘फल्ड लाईट’ची व्यवस्था केली जात आहे. यासाठी एक कोटी दहा लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच क्रीडा संकुलाचा परिसर मोठ-मोठ्या लाईटने लखलखणार आहे.

जिल्ह्यात उदयोन्मुख खेळाडूंना सरावासाठी एकही सुसज्ज क्रीडा संकुल नव्हते. त्यामुळे क्षमता असूनही अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचू शकले नाहीत. खेळाडूंना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देता यावा, यासाठी नेहरू जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट करण्याचा निर्धार तत्कालीन पालकमंत्री मदन येरावार यांनी केला. खनिज विकास निधीतून अत्याधुनिक सोई सुविधांनी सज्ज क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली.

हेही वाचा: लक्ष्मीच्या पावलांनी गौराईचे आगमन; घरोघरी उत्साहात स्वागत

क्रीडा संकुलात सिंथेटीक ट्रॅक, बास्केटबॉल मैदान, लाँग टेनिस, कबड्डी, व्हॉलिबॉल, स्केटिंग तसेच हॅन्डबॉलचे अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्ट तयार करण्यात आली आहेत. इंडोअर खेळासाठी सुसज्ज अशी इंडोअर मैदाने तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी क्रीडा स्पर्धेसाठी येणार्‍या खेळाडूंच्या निवासासाठी निवासस्थाने तसेच भोजन व्यवस्थेसाठी मेस तयार करण्यात आली आहे. मैदानात प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी बैठक व्यवस्था तयार करण्यात येत आहे. मैदानात उपलब्ध सुविधांचा लाभ खेळाडूंना रात्री घेता यावा, यासाठी मैदानात चार मोठे ‘फल्ड लाइट’ लावण्यात येणार आहे. यासाठी सुरूवातीला 75 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

मात्र, मैदानाचा परिसर लक्षात घेता या ठिकाणी चार लाईटची गरज आहे. यासाठी एक कोटी दहा लाख रूपयांचा निधी आवश्यक होता. ही बाब लक्षात घेता आमदार मदन येरावार यांनी निधीसाठी पुढाकार घेतला. नुकत्याच झालेल्या क्रीडा संकुल विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे अतीरिक्त 35 लाख रूपयांच्या निधीची मागणी केली. या मागणीला मंजुरी देण्यात आली. लाईटसाठी 35 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून लवकरच क्रीडा संकुलात लाईटची सुविधा तयार होणार आहे. त्यामुळे क्रीडा प्रेमी खेळाडूंना रात्री उशीरापर्यंत सराव करता येणार आहे.

सुसज्ज क्रीडा संकुल

शहरात तयार होत असलेले क्रीडा संकुल खेळाडूंसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली मैदान या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. यांचा खेळाडूंना फायदा होणार आहे. तत्कालीन पालकमंत्री मदन येरावार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे क्रीडासंकुल विदर्भातील मोजक्या क्रीडा संकुलांपैकी एक बनणार असल्याचे सांंगण्यात आले.

loading image
go to top