लग्नाला जायला निघाले अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकले... चोर ताब्यात 

yavatmal police
yavatmal police

यवतमाळ : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्यानंतर गॅस कटरने एटीएम मशीन फोडून रोकड पळविणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. यवतमाळ पोलिसांनी उत्तरप्रदेशात जाऊन या टोळीच्या मुस्क्‍या आवळल्या. त्यांच्याकडून पाच लाखांची रोकड जप्त करण्यात यश मिळविले. 

मो. साकीर मो. जाफर (वय 32), सरफराज उमरखान (वय 33, दोघेही रा. भोजपूर, जि. गाजीयाबाद, उत्तरप्रदेश), अशी अटकेतील कुख्यात चोरट्यांची नावे आहेत. पांढरकवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथील एसबीआय शाखेचे एटीएम फोडून सात लाखांची रोकड उडविली होती. ही घटना 16 ते 17 नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान घडल्याने खळबळ उडाली होती. 
 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला स्प्रे
चोरट्यांनी आपली ओळख पटू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. गॅस कटरने वीस मिनिटात रोकड पळविली. या प्रकरणी इपीएम चॅनेल मॅनेजर मनोज जाधव (रा. किन्हाळा, ता. कळंब) यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काहीच कैद न झाल्याने या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते. 

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी यासाठी चार स्वतंत्र पथक नियुक्त केले. पोलिस पथकाने पारंपरिक तपासाला छेद देत तांत्रिक बाबींचा आधार घेतला. एटीएमची रेकी करण्याची पद्धत लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणे सुरू केले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे त्यांचा क्‍लू मिळाला. तपास करता करता चोरट्यांची टोळी उत्तर प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. 

तेथे जाऊन आरोपींना ताब्यात घेणे ही तारेवरची कसरत. मात्र, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांचे आयपीएस बॅचमेट असलेल्या अधिकाऱ्यांनी यवतमाळच्या पथकाला मदत केली. तीन दिवस गाजीयाबद येथील भोजपूर येथे तळ ठोकून शुक्रवारी (ता.13) दोन्ही चोरट्यांना चारचाकी वाहनातूनच ताब्यात घेतले. वाहनाच्या झाडाझडतीत पाच लाखांची रोकड, गॅस कटर, मोबाइल मिळून आले. मो. साकीर व सरफराज खान यांच्याकडून एकूण 11 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

त्यांनी महाराष्ट्रासह परराज्यात फोडलेल्या एटीएमचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, एसडीपीओ अमोल कोळी, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सचिन पवार, मंगेश भोंगाडे यांच्या पथकाने केली. 

चारचाकीतून अटक 
पोलिस पथकाने भोजपूर येथे तळ ठोकून चोरट्यांचा शोध सुरू केला. त्यांच्या घरावर एक पोलिस पथक नजर ठेवून होते. मात्र, चोरटे घरी गावात येत नव्हते. अखेर नातेवाइकाचे लग्न असल्याने दोघेही येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या वाहनाने येताच जाळ्यात अडकले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com