...अन् पोलिसांच्याही हृदयाला फुटला पाझर; वाचा कोविड सेंटरमधून पळून गेलेला इसम काय सांगतो...

Yavatmal police was found absconding Corona patient
Yavatmal police was found absconding Corona patient

मारेगाव (जि. यवतमाळ) : येथील कोविड केअर सेंटरमधून बुधवारी पहाटे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेला होता. यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. पोलिस, महसूल, आरोग्य यंत्रणा व वनविभागसुद्धा शोधकार्यात गुंतले गेले होते. हा रुग्ण सोमवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील धामणी शेतशिवारातील गोठ्याजवळ आढळून आला अन्‌ पुढील घटनाक्रम पुढे आला. 

मारेगाव येथील चिंदूजी पुरके आश्रमशाळा येथे असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये वणी तालुक्‍यातील राजूर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले नेत (वरुड) आणि कुंभा येथील काही व्यक्तींना विलगीकरणात ठेवले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात कुंभा येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन कुंभा येथील एक प्रभाग सील केला होता.

तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचार कोविड केअर सेंटरमध्ये सुरू होता. बुधवारी पहाटे हा रुग्ण कोविड केअर सेंटरमधून पळून गेला होता. याबाबतची माहिती तातडीने तहसीलदार व ठाणेदार यांना देण्यात आली. कोविड-19ची बाधा झालेला व्यक्ती गायब झाल्याने प्रशासन खळबडून जागे झाले. तसेच लोकांमध्ये भीती पसरली होती. 

पोलिसांनी शोधमोहीम राबविली असतानाही इसमाचा थांगपत्ता लागला नाही. गुरुवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारात हा व्यक्ती तालुक्‍यातील धामणी येथील शेतशिवारात गुरांच्या गोठ्याजवळ असल्याचे एका तरुणाला दिसला. त्याने याबाबत पालिस पाटलांना माहिती दिली. त्यांनी मारेगाव पोलिसांना कळविले. पोलिस 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसह धामणी येथे पोहोचले. त्यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन पुन्हा कोविड केअर सेंटरमध्ये आणले. शोधकार्यात पोलिस निरीक्षक, जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, पोलिस कर्मचारी किशोर आडे, अजय वाभिटकर व नितीन खांदवे आदींचा सहभाग होता.

गुरांवर त्याची माया

कुटुंबातील सर्वच व्यक्ती विलगीकरणात आहेत. गोठ्यात सर्जा-राजासह गुरे बांधून आहेत. त्यांना चारा कोण घालत असेल? ते उपाशी तर नसतील? या प्रश्नाने मन व्याकुळ झाले आणि कुणालाही न सांगता गुरांना चारा टाकण्यासाठी आपण कोविड केअर सेंटरमधून निघून गेलो. असे फरार झालेल्या कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीने पोलिसांना सांगितले. गुरांवरील त्याची माया बघून पोलिसांचाही हृदयाला पाझर फुटला. 

कुटुंबच विलगीकरण कक्षात

वणी तालुक्‍यातील राजूर येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने मारेगाव तालुक्‍यातील नेत (वरुड) आणि कुंभा येथील काही व्यक्तींना विलगीकरणात ठेऊन कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात कुंभा येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला. प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेऊन कुंभा येथील प्रभाग सील केला आणि त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे सदर व्यक्तीचे कुटुंबच विलगीकरणात आहे.

गुरांच्या हंबरण्याचे आवाज कानात घुमायचे

कोविड सेंटरमधून पळून गेलेला व्यक्‍ती सधन शेतकरी आहे. त्यांच्याकडे बैलजोडी, गायी व शेळ्या आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कुटुंबासह सर्वांनाच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. गुरांची काळजी असल्याने त्यांना चारा घालण्यासाठी कोविड केअर सेंटरमधून निघून गेल्याची माहिती सदर व्यक्तीने पोलिसांना दिली. गुरांच्या हंबरण्याचे आवाज कानांत घुमत असल्याचेही त्याने सांगितले. 

तो रात्रभर जंगलात फिरला

हा युवक कोविड केअर सेंटरमधून पळून गेला खरा मात्र लोकांच्या धाकाने गावात गेला नाही. पोलिसांच्या धाकाने त्याने रात्र जंगलात काढली. भूक लागण्याने तो सकाळी सकाळी गोठ्याजवळ आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com