यवतमाळचे नाट्यगृह 20 वर्षांनंतरही अपूर्णच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yavatmal theater still Incomplete
यवतमाळचे नाट्यगृह 20 वर्षांनंतरही अपूर्णच

यवतमाळचे नाट्यगृह 20 वर्षांनंतरही अपूर्णच

यवतमाळ : शहरासह जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी नाट्यक्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्यासह इतर नवोदितांनाही हक्काचा रंगमंच मिळावा, यासाठी गेल्या 2002मध्ये येथील बसस्थानक चौकात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले. मात्र, तब्बल 20 वर्षांनंतरही या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. आतापर्यंत या कामावर जवळपास सात कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. मात्र, तरीदेखील या नाट्यगृहाचे काम अपूर्णच असल्याने रंगकर्मींसह जिल्ह्यातील नाट्यरसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल

जिल्ह्यात वणीपासून ते पुसदपर्यंत म्हणजे जिल्ह्याच्या प्रत्येक भागात अनेक दिग्गजांनी नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. आजही अनेक कलावंत जिल्ह्यात आहेत. मात्र, नाट्य व कला क्षेत्रांतील कलावंतांसाठी यवतमाळात हक्काचा असा कलामंचच नाही. त्यामुळे नवोदितांना आपल्या कलागुणांना वाव देता येत नाही. कलावंतांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नाट्यगृह असावे, यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी पाठपुरावा केला. नाट्यगृहासाठी बसस्थानक चौकात जागा देण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या नियोजित नाट्यगृहाचे भूमिपूजनही झाले. नाट्यगृहासाठी तीन कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामधून एक हजार प्रेक्षक बसतील, एवढ्या मोठ्या नाट्यगृहाच्या कामाला सुरुवातही झाली.

हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...

गेल्या 20 वर्षांपासून या नाट्यगृहाचे काम सुरूच आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास सात कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. असे असताना अजूनही या नाट्यगृहाचे काम अपूर्णच आहे. गेल्या 20 वर्षांत या नाट्यगृहाच्या कामांत अनेक अडचणी आल्यात. कधी निधीची अडचण तर, कधी कामांची चौकशी असे एका मागून एक सत्र सुरूच आहे. त्यामुळे ज्या नाट्यकलांवतांनी आपल्या शहरातील नाट्यगृहात आपला प्रयोग होईल, असे स्वप्न पाहिले आहे, त्यांचे स्वप्न अजूनही स्वप्नच राहिले आहे. नाट्यगृहाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतरही नाट्यगृहाचे काम अपूर्णच आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात श्रेय घेण्यासाठी अनेकांनी नाट्यगृहाची छायाचित्रे प्रसिद्ध केलीत. मात्र, नाट्यगृह लवकर पूर्णत्वास यावे, यासाठी कुणाचेही प्रयत्न दिसले नाहीत. म्हणून आता अपूर्ण राहिलेल्या नाट्यगृहाचे काम केव्हा पूर्ण होईल, याकडे यवतमाळकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

नाट्यगृहाचे काम तब्बल 20 वर्षांनंतरही पूर्ण झाले नाही, हे यवतमाळसह आम्हा रंगकर्मीचे दुर्दैवच म्हणावं लागेल. कारण नाट्यगृह नसल्याने आमच्यासारख्या अनेक कलावंतांना कला सादर करण्यासाठी जागाच नाही. ज्यांच्या हस्ते नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले, ते तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे भव्य नाट्यगृहे यापूर्वीच तयारही झाले. मात्र, आपल्याकडील संबंधित लोकांची उदासिनतेमुळे नाट्यगृह अजूनही पूर्ण झाले नाही.

- अशोक आष्टीकर, ज्येष्ठ नाट्यकलावंत व मार्गदर्शक, यवतमाळ

यवतमाळच्या शेजारीच असलेले चंद्रपूर, अमरावती व नांदेड या शहरांमध्ये छान नाट्यगृहे झालेली आहेत. त्यामुळे तेथील कलावंतांना हक्काचा मंच उपलब्ध झालेला आहे. मात्र, यवतमाळ शहरात नाट्यगृह नसल्याने स्थानिक कलावंतांची मोठी कुचंबणा होत आहे. म्हणून अपूर्ण असलेल्या नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासनाने अधिक भर दिला पाहिजे.

-प्रमोद बाविस्कर ज्येष्ठ रंगकर्मी व ज्येष्ठ निवेदक, आकाशवाणी केंद्र, यवतमाळ

Web Title: Yavatmal Theater Still Incomplete

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Yavatmalvidarbha
go to top