esakal | यवतमाळ : लस उपलब्ध असताना लसीकरणाचा वेग मंदावला
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

यवतमाळ : लस उपलब्ध असताना लसीकरणाचा वेग मंदावला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या 15 जानेवारी 2021पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या मोहिमेत 18 वर्षांवरील वयोगटातील शंभर टक्के लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण करून संरक्षित करणे आवश्यक आहे. त्यातच एक सप्टेंबरपासून जिल्ह्यात मुबलक लसींचा साठा उपलब्ध आहे. तरीदेखील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या बाबीची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली आहे. तालुकास्तरीय दक्षता समिती सभेचे आयोजन करून मोहिमेत सुसूत्रता आणण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

लसीकरण मोहिमेत ग्रामसेवक व तलाठी यांचा सहभाग आवश्यक आहे. गटविकास अधिकारी व तहसीलदारांच्या संयुक्त सहीने सर्व ग्रामसेवक, तलाठ्यांनाही आदेशित करण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील वाड्या, पोड, तांडे, पारधी बेडे येथील कार्य नियोजनानुसार त्याच दिवसाला पूर्ण होईल, याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

हेही वाचा: तुम्ही एमबीए करणार आहात? तर अशी करा 'एमबीए सीईटी'ची तयारी

ग्रामीण भागातील अंथुरनास खिळून असलेले, गरोदर माता, स्तनदा माता, व्यंगत्व असलेल्या लाभार्थ्यांचे विशेष सत्र किंवा घरोघरी व्हॅनद्वारे जाऊन लसीकरण करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. लसीकरणाची गती मंदावल्याने राज्य स्तरावरदेखील गंभीरतेने दखल घेण्यात आली. राज्यस्तरावरील अधिकारी व निरीक्षक जिल्ह्यात येऊन पर्यवेक्षणही करणार आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेला पुन्हा नवीन जोमाने लसीकरणाच्या कामाला लागावे लागणार आहे. जिल्ह्यात सध्या 80 हजार लशींचा साठा उपलब्ध आहे. आतापर्यंत दहा लाख 39 हजार 268 जणांना पहिला व दुसरा असे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील स्थिती अशी

जिल्ह्यात पहिला डोस घेणार्‍यांची संख्या सात लाख 59 हजार 276 आहे. कोविशिल्डचे लाभार्थी सहा लाख 47 हजार 238, कोव्हॅक्सिनचे लाभार्थी एक लाख 12 हजार 38 आहेत. दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या दोन लाख 79 हजार 992 आहे. कोविशिल्डचे लाभार्थी दोन लाख 18 हजार 892 व कोव्हॅक्सिनचे लाभार्थी 61 हजार शंभर आहेत.

जिल्ह्यात लशींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातुलनेत लसीकरण कमी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तालुकास्तरावर दक्षता समितीची सभा घेऊन मोहिमेत सुसूत्रता आणण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

- डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ.

loading image
go to top