esakal | Yavatmal: बाळ विक्रीचा डाव उधळला
sakal

बोलून बातमी शोधा

crime

यवतमाळ : बाळ विक्रीचा डाव उधळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : पंधरा दिवसांचे बाळ दत्तक देण्याचा बहाणा करीत साडेतीन लाखांत सौदा करण्यात आला. प्रशासनाने पुढाकार घेत स्टिंग ऑपरेशन करून बाळ विक्रीचा डाव उधळून लावत टोळीतील सदस्यांना जेरबंद केले. ही कारवाई गुरुवारी (ता. ३०) वणी येथे करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

वणी येथील बेटी फाउंडेशन संस्थेने पंधरा दिवसांचे बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला होता. सदर संदेश अकोला येथील बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मॅसेजची खात्री करण्यासाठी व्यूहरचना आखली. बालकल्याण समितीने बेटी फाउंडेशनला संपर्क साधून बाळाच्या विक्रीबाबतची विस्तृत माहिती संकलित केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महिला व बालकल्याण आयुक्त यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशनची रणनीती आखली. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बालसंरक्षण यंत्रणांनी डमी पालक म्हणून बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली. ३ लाख ५० हजारांत बाळाचा सौदा केला.

हेही वाचा: शहर घडविणाऱ्यांचा इतिहास लिहिला जावा : नितीन गडकरी

कारवाईदरम्यान संबंधित बाळाचे आई-वडील आणि यात सहभागी बेटी फाउंडेशनच्या प्रीती कवडू दरेकर, कवडू गजानन दरेकर, गौरी बोरकुटे, मंगला किशोर राऊत, पालक सुनील महादेव डहाके, पंचफुला सुनील डहाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनात अकोल्याच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, दोन्ही जिल्ह्यातील बालसंरक्षण यंत्रणा, पोलिस विभाग यांच्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले आहे. कारवाईदरम्यान यवतमाळ बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील घोडेस्वार, जिल्हा परिवीक्षाधीन अधिकारी गजानन जुमळे, अकोला जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुलें, रवींद्र गजभिये महिला व बालविकास कर्मचारी, ठाणेदार व पोलिस पथकाने कामगिरी पार पाडली.

हिस्सेवाटणी ठरली होती

बेटी फाउंडेशनच्या सदस्यांनी बाळाच्या आईवडिलांना १ लाख ५१ हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. तर, उर्वरित रक्कम संस्थेचे पदाधिकारी वाटून घेणार होते. मात्र, बालकल्याण समिती व पोलिसांच्या कारवाईने त्यांचे पितळ उघडे पडले. पंधरा दिवसांच्या मुलीस प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन करून अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रणेद्वारे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले.

loading image
go to top