यवतमाळचा ‘टांगा चौक’ आता नावालाच; ओळख मात्र कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha

यवतमाळचा ‘टांगा चौक’ आता नावालाच; ओळख मात्र कायम

यवतमाळ : शहराची ओळख असलेल्या येथील टांगा चौकात गेल्या 20 वर्षांपूर्वीपर्यंत आठ ते दहा टांगे उभे राहायचे. त्यानंतर मात्र, येथे आता एकही टांगा दिसत नाही. शहरांतर्गत ये-जा करण्यास ऑटोरिक्षांसह दुचाकी व इतर वाहने आल्याने टांगामध्ये बसून होणार्‍या सवारींना ब्रेक लागला. मात्र, आता नावालाच राहिलेल्या ‘टांगा चौक’ची ओळख यवतमाळकारांमध्ये आजही कायम आहे.

यवतमाळ शहरातील संविधान (जुने बसस्थानक) चौकापासून कळंबकडे जाणार्‍या मार्गालगतच डाव्या बाजूने असलेल्या या टांगा चौकातून 20 वर्षांपर्यंत शहरात व लगतच्या परिसरात नागरिक टांगामध्ये बसून जायचे. त्यामुळे हा परिसर दिवसभर गजबजलेला असायचा. विशेष म्हणजे त्या काळात ऑटोरिक्षा किंवा दुचाकी आदी वाहने जास्त नव्हती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी टांगामधूनच जावे लागत असे.

मात्र, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून शहरात ऑटोरिक्षांसह दुचाकी व इतर वाहनांची संख्या वाढली. त्याचा परिणाम यवतमाळची एक वेगळी ओळख राहिलेल्या टांगामधून जाणार्‍या सवारीवर झाला. नागरिकांनीही बदलत्या काळाला व वेळेला महत्त्व देत ऑटोरिक्षांसह दुचाकी व पेट्रोल-डिझेलवर चालणार्‍या वाहनांतून प्रवासाला प्राधान्य दिले.

हेही वाचा: 'वीर दासला चाबकाचे फटके दिले पाहिजे'; 'शक्तीमान' भडकला

या बदलाचा परिणाम म्हणून या टांगा चौकातून एक एक टांगा कमी होत गेला व आता एकही टांगा या चौकात दिसत नाही. मात्र, या चौकात टांगामध्ये बसायला येणार्‍या प्रवाशांना व टांगाचालकांना त्यावेळी सावली देणारा पिंपळाचा वृक्ष आजही या चौकात साक्षीदार म्हणून उभा आहे. या परिसरात आता बजाज चौक असा फलक लावलेला दिसतो. मात्र, यवतमाळकरांमध्ये हा भाग आजही ‘टांगा चौक’ म्हणूनच ओळखला जातो.

यवतमाळ शहरात पूर्वी टांगाचालकांना चांगले दिवस होते. सरकारी दवाखाना ते बसस्थानक असा मी नेहमीच सवारी घेऊन जायचो. आताही एका सवारीला दहा ते 15 रुपये व स्पेशलसाठी 40 ते 50 रुपये घेतो. मात्र, ऑटोरिक्षा आल्याने काही जण टांगामध्ये बसत नाहीत. म्हणून सवार्‍या कमी मिळतात.

- सय्यद लतीफ सय्यद हबीब, टांगाचालक, यवतमाळ

हेही वाचा: Corona Update : राज्यात आजही रुग्ण संख्येत घट; तर १५ रुग्णांचा मृत्यू

आमचे वडील शीतलदास पहुजा यांनी 45 वर्षांपूर्वीपासून या चौकात कापड दुकान सुरू केले. आम्ही लहान असताना या भागात टांगा पाहिले आहेत. मात्र, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ऑटोरिक्षा, दुचाकी व इतर वाहने आल्याने आता टांगा बंद झाले आहेत. म्हणजे या चौकात आज एकही टांगा राहत नाही. परंतु, चौकाची आजही ‘टांगा चौक’ अशीच ओळख कायम आहे.

- शंकरलाल पहुजा, कापड व्यापारी, टांगा चौक, यवतमाळ

आज मी 61 वर्षांचा आहे. गेल्या 40 वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवीत आहे. सुरुवातीला ट्रक व इतर मोठे वाहने चालवायचो. या चौकात जवळजवळ आठ ते दहा टांगे मी पाहिले आहेत. मात्र, ऑटो व इतर वाहने आल्याने गेल्या 20 वर्षांपासून टांगा कमी झाले असून, आता शहरात केवळ एक किंवा दोन टांगे शिल्लक आहेत.

- रुपरावजी दारव्हेकर, ऑटोचालक, टांगा चौक, यवतमाळ

loading image
go to top