राज्यात नावाजलेले शेततळ्यांचे गाव पाहिले का? ते आता बनले कृषी पर्यटन स्‍थळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

शेततळ्यांवर वीज जोडणी देण्याचा पहिला प्रयोग आमदार फुंडकर यांच्‍या प्रयत्‍नांनी येथे राबविण्यात आला आणि तो यशस्‍वी झाला. शेततळ्याच्‍या माध्यमातून शेतीला पाणी आणि वीज मिळाल्‍याने येथील शेतकरी आता बारोमास विविध पीके घेत आहेत.

खामगाव (जि.बुलडाणा) : खारपाण पट्ट्यामुळे पिण्याच्‍या पाण्यासोबतच जमिनीची सुपीकता धोक्‍यात आलेली आहे. परंतू येऊलखेड येथील शेतकऱ्यांनी त्‍यावर मात करीत शेततळ्यांच्‍या माध्यमातून खारपाणपट्ट्यात नंदनवन फुलविले. शेगाव तालुक्‍यातील येऊलखेड हे शेततळ्यांचे गाव म्‍हणून राज्‍यात प्रसिध्दीस येत असून एक हजार लोकवस्तीचे येऊलखेड आता शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटनस्थळ म्हणून समोर आले आहे.

विदर्भ पंढरी शेगाव तालुक्यातील येऊलखेड या गावात गेल्या पाच-सहा वर्षांत शेततळ्यामुळे क्रांती झाली आहे. खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्‍या प्रयत्‍नांनी गावांमध्ये शेततळ्यांची निर्मिती झाली. विशेष म्‍हणजे शेततळ्यांवर वीज जोडणी देण्याचा पहिला प्रयोग आमदार फुंडकर यांच्‍या प्रयत्‍नांनी येथे राबविण्यात आला आणि तो यशस्‍वी झाला. शेततळ्याच्‍या माध्यमातून शेतीला पाणी आणि वीज मिळाल्‍याने येथील शेतकरी आता बारोमास विविध पीके घेत आहेत. येऊलखेड हे गाव पुर्णतः खारपाणपट्ट्यात मोडते. त्यामुळे जमिनीतील पाणी सिंचनासाठी, पिण्यासाठी योग्य नाही. परिणामी शेती करताना इतरांप्रमाणेच याही गावकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. यातून मार्ग शोधत गावकऱ्यांनी शेततळ्यांची साथ निवडली. 

महत्त्वाची बातमी - वारिस पठाण तुला फाडून टाकेल; शिवसेना आमदाराचा इशारा

2014 पासून या गावात 85 शेततळी निर्माण
2014 पासून या गावात 85 शेततळी निर्माण झाली आहेत. पावसाचे पाणी शेततळ्यात साठवून शेतकरी जिद्दीने हंगामी पिके घेत आहेत. काहींनी तर पेरूसारख्या फळबागांची लागवड केली. फूलशेती सुरू झाली. भाजीपाल्याची पिके शेतकरी घेत आहेत. गावाला भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली. यावर्षात तर जानेवारी महिन्यात विविध जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने शेतकरी येऊलखेडच्या गाव-शिवारात भेटीसाठी येऊन गेले. एकट्या चंद्रपूर जिल्हयातून 200 पेक्षा अधिक शेतकरी भेट देऊन गेले. पोकरा प्रकल्पाचे संचालक गणेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊलखेडला भेट देत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. येऊलखेड हे गाव आता कृषी पर्यटन स्‍थळ म्‍हणून नावारुपास येत आहे.

शेततळ्यांमुळे शेतकरी जिद्दीतून पुढे
खारपाण पट्ट्यामुळे शेतीत असंख्य अडचणी येत होत्‍या. मात्र, गावात तत्‍कालीन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्‍या माध्यमातून शेततळ्याची मोठ्या प्रमाणावर कामे झाली. त्‍या शेततळ्यांमुळे विविध पीके घेवून शेतकरी जिद्दीतून पुढे जात आहेत.
-शशिकांत पुंडकर, शेतकरी येऊलखेड

विविध पिके शेतकरी घेताय
खारपाण पट्ट्यात शासकीय योजनांमधून शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली. प्रत्येकाने शेततळे घेत पिकपद्धतीत बदल घडवून आणला. खारपाण पट्ट्यात पावसाच्या पाण्यावर आधारीत संरक्षित शेती होऊ शकते हे येऊलखेड गावाने दाखवून दिले. यातूनच पेरू, फूलशेती, भाजीपाल्याची पिके शेतकरी घेत आहेत. गावकऱ्यांनी 85 शेततळे बांधले. या शेततळ्यांवरून सिंचन करण्यासाठी वीज पुरवठा सुद्धा देण्यात आला आहे.
-ॲड. आकाश फुंडकर, आमदार खामगाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yeulkhed became an agricultural tourist destination