
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : नवीन शैक्षणिक धोरणामुळे समाजात विविध बदल होणार आहेत. देशातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना शाळेत दाखल करून पूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनासह अनेक संस्था प्रयत्नरत आहेत. परंतु अजूनही समाजात शाळाबाह्य मुले आहेत. त्या प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी राज्यातील सुमारे ६० हजार गावे, वस्ती, तांडा याठिकाणी "बालरक्षक' नियुक्त केले जाणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक मुलाला शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
९ जानेवारी २०१७ ला जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा शासन निर्णय आला. यामध्ये इयत्ता आठवीपर्यंत तब्बल सव्वाचार लाख मुले शाळाबाह्य असल्याचे नमूद होते. त्यानंतर राज्यात बालरक्षक चळवळ उभी करून या माध्यमातून चार लाखांपेक्षा अधिक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. बालरक्षक व मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक स्तरावर संरक्षक म्हणून टास्क फोर्स निर्माण करून त्यात स्थानिक प्राधिकरणातील महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश राहणार आहे.
प्रत्येक मुलाचे शिक्षण महत्त्वाचे असल्याने राज्यातील मुख्यमंत्र्यांपासून कोतवालापर्यंत आणि समाजातील कुठलाही सजग नागरिक बालरक्षक म्हणून भूमिका निभावू शकतो. आज शिक्षकांसोबत पोलिस, बसवाहक, पत्रकार आदी ही भूमिका निभावत आहेत. राज्यस्तरावर बालरक्षकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ओळखपत्र व यथोचित सन्मान देण्यात येणार आहे.
शिक्षण राज्यमंत्र्यांची तत्परता
अमरावती परिसरातील वीटभट्टीवरील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून स्वतः शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बडनेरा परिसरातील वीटभट्टी शाळेला भेट दिली. त्या मुलांच्या प्रवास तथा शिक्षणासाठी खिशातील ३० हजार रुपये त्यांनी तत्काळ काढून दिले व पुढील महिन्यात राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय आर्थिक तरतूद मंजूर केली.
सविस्तर वाचा - अरे व्वा! पोलिसांची तर मज्जाच मज्जा...वाचा सविस्तर
शिक्षक आयुक्तांची बैलबंडीतून मिरवणूक
पुणे परिसरातील सोमेश्वर साखर कारखाना येथे अनेक बालके शाळाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाला कळाले. तेव्हा शिक्षण आयुक्त डॉ. विशाल सोळंकी यांनी स्वतः पाच तास तेथे उसतोड मजुरांशी चर्चा केली. एका उच्च अधिकाऱ्याची आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली धडपड पाहून पालकही गहीवरून गेले. आणि तब्बल १०० मुले शाळेच्या प्रवाहात आली. त्यावेळी पालकांनी चक्क शिक्षण आयुक्तांची बैलबंडीतून मिरवणूक पण काढली होती.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.