कौतुकास्पद! तो चौदा वर्षांचा, ऑनलाइन शिक्षण घेण्यासह करतो डवरणीचे काम...वाचा सविस्तर 

बबलू जाधव 
Tuesday, 21 July 2020

वडील शेतकरी असून शेतीमध्ये घाम गाळतहेत मात्र लॉकडाउनमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. शेतात राबणाऱ्या वडिलांची मेहनत बघवत नाही. त्यात दहावीचे महत्त्वाचे वर्ष. अशा परिस्थितीत अडकलेला एक मुलगा.

दिग्रस (जि. यवतमाळ) : गेल्या तब्बल तीन ते चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यात कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था सर्व काही बंद झाले आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुळे सर्वच जण चिंतेत आहेत. मात्र या कठीण परिस्थितीवरही धैर्याने आणि मेहनतीने कशी मात करायची, याची प्रेरणा एका दहावीच्या मुलाने सर्वांना दिली आहे. 

वडील शेतकरी असून शेतीमध्ये घाम गाळतहेत मात्र लॉकडाउनमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. शेतात राबणाऱ्या वडिलांची मेहनत बघवत नाही. त्यात दहावीचे महत्त्वाचे वर्ष. अशा परिस्थितीत अडकलेला एक मुलगा. पण ते म्हणतात ना, अंगात जिद्द असली; तर काहीच अशक्‍य नाही. हीच जिद्द दाखवली यवतमाळ जिल्ह्याच्या दिगस तालुक्‍यातील धानोरा गावच्या साई ठाकरे याने. 

हेही वाचा - युवक दारू पिऊन आला अन्‌ विलगीकरण कक्षात घुसून केला वृद्धेचा विनयभंग, वार्ता पसरताच...

दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती असतानाही साईने शाळेचे ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे. मात्र त्यासोबतच प्रत्येकासमोर आदर्श निर्माण होईल, असे कार्य केले आहे. 

ऑनलाइन वर्ग झाल्यावर थेट शेतात 

साई ठाकरे याचे वडील गणेश ठाकरे यांची धानोरा (बु.) येथे साडेतीन एकर; तर दुसरी दीड एकर, अशी एकूण पाच एकर शेती आहे. एका साडेतीन एकरात सोयाबीन; तर दीड एकरात कपाशी आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्ग संपला की त्यांचा मुलगा साई ठाकरे या कामात त्यांची मदत करीत आहे. 

अधिक माहितीसाठी- काय हे नशीब! घोडे, श्‍वान, बकरेही करतात रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास 

स्वत:च्या बैलजोडीने डवऱ्यांचा फेर 

सोयाबीन आणि कपाशीत गवत वाढले असल्याने गणेश ठाकरे यांना प्रचंड मेहनत करावी लागत आहे. त्यासाठी तो सोयाबीन व कपाशीत डवऱ्याचा फेर मारणे आवश्‍यक आहे. साई ठाकरे हा स्वतः शेतात जाऊन कपाशी आणि सोयाबीनमध्ये वाढलेले गवत काढत आहे. दहावीत शिकणाऱ्या या मुलाने स्वतःचा अभ्यास सांभाळून शेतीकाम केल्यामुळे सध्या त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy doing farm works to help his father read full story