युवक दारू पिऊन आला अन्‌ विलगीकरण कक्षात घुसून केला वृद्धेचा विनयभंग, वार्ता पसरताच...

मनोहर बोरकर 
Tuesday, 21 July 2020

काही युवतींनी मोबाईलवरून याचे व्हिडिओ शूटिंग केले. तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. मात्र, कोणतीही पोलिस कारवाई न करता समज देऊन त्याला सोडून दिले. युवकाने मद्यधुंद अवस्थेत विलगीकरणात प्रवेश करून वृद्धेचा विनयभंग केला. तसेच युवतींना धमकी देऊन अश्‍लील चाळे केले. यामुळे महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. 

एटापल्ली (जि. गडचिरोली) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे रूपांतर महिला विलगीकरण कक्षात करण्यात आले आहे. महिलांसाठी वेगळा कक्ष तयार करण्यात आला असून, विविध शहर व राज्यांतून प्रवास करून आलेल्या सात युवतींसह दहा महिला संस्थानात्मक विलागीकरणात ठेवण्यात आल्या आहेत. चक्‍क विलगीकरण कक्षात जात युवकाने वृद्धेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात रात्री नऊ वाजताच्या सुमारास रोशन सोनी (वय 23) हा शिरला. त्याने दारू प्राशन केली होती. त्याने वसतिगृहात असलेल्या संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष इमारतीत प्रवेश केला. दुसऱ्या माळ्यावर जाऊन वृद्ध महिला असलेल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला. त्याचे हे कृत्य खोलीत झोपून असलेल्या वृद्धेच्या लक्षात आल्याने आरडाओरड केली. त्यामुळे त्याने खोलीच्या बाहेर पळ काढला.

सविस्तर वाचा - राजकीय समझोता?, माजी मुख्यमंत्र्यांचे गृहमंत्र्यांना पुन्हा पत्र; मानले आभार...

काही वेळांनी तो परत आला. यावेळी विलगीकरणातील महिला व युवतींनी त्याला विलगीकरण इमारत परिसराच्या बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, तो महिला व युवतींकडे पाहून अश्‍लील चाळे करीत बाहेर गेला. त्याचा धिंगाणा एवढ्यावरच थांबला नाही. काही वेळाने आणखी एका मित्राला घेऊन तो पुन्हा आला आणि महिलांना ठार मारण्याची धमकी दिली. 

काही युवतींनी मोबाईलवरून याचे व्हिडिओ शूटिंग केले. तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. मात्र, कोणतीही पोलिस कारवाई न करता समज देऊन त्याला सोडून दिले. युवकाने मद्यधुंद अवस्थेत विलगीकरणात प्रवेश करून वृद्धेचा विनयभंग केला. तसेच युवतींना धमकी देऊन अश्‍लील चाळे केले. यामुळे महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. 

वार्ता पसरताच कारवाई

विलगीकरणातील महिला व नातेवाइकांकडून रोशन सोनी व त्याला मदत करणाऱ्या आणखी दुसऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विलगीकरण कक्षाला सुरक्षा उपलब्ध करून देण्याची संबंधितांनी केली. या घटनेची वार्ता सर्वदूर पसरताच पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचे कळते.

हेही वाचा - 'ऑडिओ क्‍लिप'बाबत गृहमंत्र्यांचे फडणवीस यांना पत्र, काय म्हणाले ते...

गुन्हा दाखल, मुख्य आरोपी फरार

शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात सस्थानत्मक विलगीकरणात असलेल्या वृद्धेला धक्काबुक्की व अश्‍लील चाळे करणारा मद्यधुंद युवक रोशन सोनी (वय 23) व त्याला मदत करणारा अल्पवयीन बालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी रोशन सोनी फरार आहे. त्याला मदत करणारा अल्पवयीन रोहित घोषला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

बालकाची बालसुधार गृहात रवानगी केली जाणार

कोर्टाच्या परवानगीने अल्पवयीन बालकाची रवानगी बालसुधार गृहात केली जाणार आहे. फरार रोशन सोनीचा कसून शोध घेतला जात असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी सांगितले. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार व्यंकटेश येल्लेला यांच्याकडून केला जात आहे. 

संपादन : नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alcoholic youth molested old woman in the Woman separation room