कर्जाच्या चिंतेतून घेतला तरुण शेतकऱ्याने गळफास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

कर्जामुळे चिंतातूर असलेले प्रमोद शनिवारी नेहमीप्रमाणे शेतावर गेले. त्यावेळी आई- वडील देखील शेतावरच होते. मात्र, प्रमोदच्या मनात वेगळेच काहीतरी होते.

चिमूर (जि. चंद्रपूर)  : तालुक्‍यातील खापरी (भिवकुंड) येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. मृत शेतकऱ्याचे नाव प्रमोद नारायण मेश्राम असून ते 27 वर्षांचे होते. 

पावसामुळे पीक नष्ट

चिमूर तालुक्‍यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खापरी (भिवकुंड) येथील युवा शेतकरी प्रमोद मेश्राम यांच्याकडे सात एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी शेतीसाठी सहकारी संस्था व खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. मात्र, परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. कापणीला आलेले पीक पावसामुळे खराब झाले. त्यामुळे यंदा उत्पादन कमी होणार. मग आपण सोसायटी आणि खाजगी सावकाराच्या कर्जाची परतफेड कशी करणार याची चिंता त्यांना सतावू लागली. या भीतीपोटी त्यांना रात्री झोपसुद्धा येत नव्हती. 

 

 बापरे! - चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

 

प्रमोदला चिंतेने ग्रासले 

कर्जामुळे चिंतातूर असलेले प्रमोद शनिवारी नेहमीप्रमाणे शेतावर गेले. त्यावेळी आई- वडील देखील शेतावरच होते. मात्र, प्रमोदच्या मनात वेगळेच काहीतरी होते. त्यामुळे तो शेतातून एकटाच घरी आला. घरी कुणीच नसल्याची संधी साधून घरातच प्रमोदने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आई-वडिलांनी फोडला टाहो 

प्रमोदचे आई-वडील काम आटोपून सायंकाळी पाच वाजता शेतातून घरी परतले. आपल्या घरी असे काही अघटीत घडले असावे, असे त्यांच्या ध्यानीमनीसुद्धा नव्हते. घरी प्रमोद असावा असे त्यांना वाटवे असावे. त्यांनी घराचे लोटले अन्‌ दोघांनीही एकदम टाहोच फोटला. प्रमोदने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

 

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर 

घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण पोलिसांच्या हाती लागले नाही. मात्र, नापिकी आणि खाजगी सावकाराच्या कर्जामुळे प्रमोदने आत्महत्या केल्याचे गावातील नागरिक आणि त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. तरुण मुलाच्या अचानक जाण्याने मात्र प्रमोदच्या आई-वडिलांवर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young farmer hang himself due to loan and crop unfertility