सावधान! तरुणाई जात आहे सट्ट्याच्या आहारी

संतोष मद्दीवार 
Friday, 16 October 2020

बेटिंगला भारतात कायदेशीररीत्या बंदी आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून देशभरातच बेटिंगचे लोण पसरले आहे. त्यामुळे क्रिकेट हा सभ्य मंडळींचा खेळ न राहता सट्टेबाजांचा खेळ झाला आहे.

अहेरी (जि. गडचिरोली) : आयपीएल येताच अहेरी परिसरात सट्टेबाजीला ऊत आला आहे. जवळपास दरदिवशी लाखोंची उलाढाल सुरू आहे. विद्यार्थी, नवतरुणांपासून तर बरेच प्रतिष्ठित लोक यात उद्‌ध्वस्त होत आहेत. सर्वच वयोगटातील लोक यात आहेत, परंतु तरुणाई मात्र अधिक प्रमाणात आहारी गेली आहे. राजनगरीत सट्टा जोरात असूनही आजवर एकही पोलिस कारवाई झाली नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बेटिंगला भारतात कायदेशीररीत्या बंदी आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून देशभरातच बेटिंगचे लोण पसरले आहे. त्यामुळे क्रिकेट हा सभ्य मंडळींचा खेळ न राहता सट्टेबाजांचा खेळ झाला आहे. स्मार्ट फोन व इंटरनेट आल्यापासून गावखेड्यांतही बुकी तयार झाले आहेत. मॅच सुरू झाल्याबरोबर चौकाचौकांत सट्टेबाजांचे घोळके आढळतात. अहेरीत बरेच तरुण कर्जबाजारी झाल्याने घरदार सोडून पळून गेले होते. परंतु पालकांनी आपल्या स्तरावर कसेबसे देणे दिल्यानंतर परतले व तक्रार न झाल्याने अशी बरीच प्रकरणे दबली गेली आहेत. काही तरुणांमध्ये तर बेटींगचे व्यसन इतर वाढले की आयपीएल नसले तरीही वर्षभर बेटींगसाठी संधी शोधून पैजा लावताना दिसतात. 

मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा; पोलिसाला मारणे पडले महागात
 

अगदी ल्युडो या खेळातदेखील हजारोंची बेटींग करून तलफ भागवतात. कुठल्याही फारशा बघितल्या न जाणाऱ्या टुर्नामेंटमधील सामन्यांवरसुद्धा बेटिंग लावली जाते. पैसे नसल्यास मोबाईल फोन, दुचाकीची सर्रास पैज लावली जात असते. अहेरीत तर मोठ्या संख्येत तरुण मंडळी सटोरी म्हणून विख्यात आहेत. आयपीएलचा हंगाम तर या सर्व सटोरींकरिता पर्वणीच ठरत आहे, तर ऑनलाइन बेटींगमधील कमिशनच्या कमाईच्या लालसेने चांगली-चांगली तरुण मंडळी बुकींच्या व्यवसायाकडे ओढले जात आहे. या प्रकाराकडे अशीच डोळेझाक झाल्यास आत्महत्या,चोऱ्या, टोळीयुद्ध, गुंडगिरीचे प्रकार वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वेळीच यावर प्रशासनाने आवर घालून हा प्रकार बंद व्हावा, यासाठी व्यापक कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

मुलगा विहिरीत तडफडत होता; त्याला वाचविण्यासाठी आई आकांत करीत होती; पण नियतीनं साधला डाव 
 

याकडेही लक्ष देण्याची गरज...

सध्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीवरून रणकंदन माजले आहे. दारू किंवा तंबाखूसारख्या व्यसनांनीच संसार उद्‌ध्वस्त होतात, असेच ठसविण्यात येत आहे. हे खरे असले, तरी त्यासोबत चरस, गांजा, ड्रग्सची व्यसनेही वाढत आहेत. शिवाय कोंबडबाजार, सट्टेबाजी, पत्त्यांचा जुगार ही देखील एक नशाच आहे. त्याचेही अनेकांना व्यसन जडते आणि त्यांच्यासोबत त्यांचे आयुष्य व परिवारही उद्‌ध्वस्त होतो. त्यामुळे दारूबंदी किंवा तंबाखूसारख्या व्यसनांबद्दल चर्चा करताना या समस्यांचाही ऊहापोह होणे आवश्‍यक आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young generation is Addicted by Gambling