esakal | कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा

बोलून बातमी शोधा

कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा
कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा
sakal_logo
By
विवेक राऊत

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : सध्याच्या कोरोना (Corona) महामारीच्या काळात नातेवाईक दूर होत असून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सर्व धडपडत आहेत. अशा बिकट परिस्थितीत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे (Corona Patients) प्रचंड हाल होत आहेत. अशा स्थितीत तालुक्‍यातील (Amravati district) 28 वर्षीय सुशीलने आपल्या स्वतःच्या व्हॅनला रुग्णवाहिकेचे (Ambulance) स्वरूप देत रुग्णसेवा सुरू केली आहे. पैसे असो नसो रात्री-बेरात्री सुशील गावातील रुग्णांसाठी देवदूत बनला आहे. (Young man from Amravati district converted his car into ambulance for corona patients)

हेही वाचा: Breaking: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव; CBI नं दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी याचिका

सुशील ज्ञानदेवराव शेंडे, असे या देवदूताचे नाव. तालुक्‍यातील सातेफळ या गावात सुशील एका खासगी शाळेवर काम करतो. दोन महिन्यांअगोदर सुशीलला कोरोना झाला होता. तेव्हा त्याला रुग्णालयात जायला त्रास झाला. त्यातून सुशील सुखरूप बाहेर आला, पण आपल्याला जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये म्हणून त्याने स्वतःची चारचाकी रुग्णसेवेसाठी अर्पण केली.

कोरोनाची लागण झाल्यावर त्याला लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे असते, याची जाणीव सुशीलला होती. गावातील कोरोना रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी जेव्हा इतर वाहनचालक, मालक नकार देत होते, तेव्हा सुशील समोर आला व स्वतःच चालक बनून कोरोना रुग्णांना दवाखान्यापर्यंत सोडण्याचे कार्य सुरू केले. आजपर्यंत 50 च्यावर गावासह परिसरातील रुग्णांना सुखरूपपणे त्याने तालुक्‍याच्या किंवा जिल्ह्यातील रुग्णालयात पोहोचविले आहे. या कामात त्याला हिंमत देत सहकार्य करणाऱ्या मित्रांमध्ये गावातीलच विशाल झाडे आणि गणेश तितरे हे मदत करतात.

अनेक वेळा परिस्थिती पाहून सुशीलने स्वतःच्या दुचाकीवरूनही रुग्णांना दवाखान्यात पोहोचविले आहे. आज जेथे नात्यातील सख्खे नातेवाईक कोरोना झाल्याबरोबर रुग्णापासून स्वतःला दूर करतात तेथे सुशीलची रुग्णसेवा व हिंमत अनेकांचे प्राण वाचवीत आहे. अनेक रुग्ण तपासणी अहवाल पॉझिटिव्ह यायच्या आताच ताप आला तरी घाबरतात, त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचविताना हिंमत देण्याचे तसेच त्यांना सकारात्मक विचार करण्यासाठी सुशील त्यांचे समूपदेशनही करतो. या कामासाठी कोणी त्याला भाडे देतात तर कोणी देतही नाही, पण रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या सुशीलला त्यापेक्षा रुग्ण सुखरूप दवाखान्यात पोहोचला, याचे समाधान मोठे असते.

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

(Young man from Amravati district converted his car into ambulance for corona patients)