esakal | निगेटिव्ह म्हणून सोडलेल्या व्यक्तीचा अहवाल आला पॉझिटिव्ह...चप्राड गावात दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

संस्थात्मक विलगीकरण केंद्रात कार्यरत कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांत समन्वय नसल्याने हे चारही जण गावात येऊन मनसोक्त फिरत होते. एकाच्या घरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा तेथे 50 पेक्षा अधिक लोकांची पंगत बसली होती. यात कुटुंबीयांसह विलगीकरण केंद्रातून आलेले युवकही सहभाग झाले होते. ते बिनधास्त राहत असताना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चौघांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली.

निगेटिव्ह म्हणून सोडलेल्या व्यक्तीचा अहवाल आला पॉझिटिव्ह...चप्राड गावात दहशत

sakal_logo
By
विश्‍वपाल हजारे

लाखांदूर (जि. भंडारा) : संस्थात्मक विलगीकरण केंद्रात असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून आरोग्य विभागाने त्याला घरी पाठविले. त्यानवंतर तो गावात अनेकांच्या संपर्कात आला. आता तीच व्यक्ती अचानक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चप्राड येथील संपूर्ण गावकऱ्यांवर कोरोनाचे संकट आले आहे.

चप्राड येथील चार युवक नागपंचमीच्या पूर्वसंध्येला पुणे जिल्ह्यातून गावात आले. त्यांची रवानगी लाखांदूर येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात करण्यात आली. या चारही युवकांच्या घशाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. पाच दिवसांनंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून त्यांना गावी पाठविण्यात आले.

तालुका प्रशासनाची धावपळ

संस्थात्मक विलगीकरण केंद्रात कार्यरत कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांत समन्वय नसल्याने हे चारही जण गावात येऊन मनसोक्त फिरत होते. एकाच्या घरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा तेथे 50 पेक्षा अधिक लोकांची पंगत बसली होती. यात कुटुंबीयांसह विलगीकरण केंद्रातून आलेले युवकही सहभाग झाले होते. ते बिनधास्त राहत असताना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चौघांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. यानंतर स्थानिक तालुका प्रशासनाची एकच धावपळ उडाली.


त्याची रुग्णालयात रवानगी

सोमवारी रात्री भरपावसात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांनी चप्राड येथे भेट देऊन त्या युवकाला पुन्हा ताब्यात घेऊन त्याची रवानगी भंडारा येथे सामान्य रुग्णालयात केली. या प्रकारामुळे गावात आलेल्या त्या युवकाच्या संपर्कात आलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहे.
मंगळवारी दिवसभर तालुका प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी चप्राड येथे तळ ठोकून अधिक धोका असलेले 18 व कमी प्रमाणात धोका असलेले 29 जणांना शोधून काढले, अशी माहिती आहे. यापैकी 18 जणांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविणार असून, इतरांना होमक्वारंटाइन करण्यात येणार आहे.

जाणून घ्या : बापरे... तब्बल दहा डॉक्‍टर होणार होम क्वारंटाईन; त्यांच्या संपर्कात अनेक, आता...

अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा भोवला

याबाबत अधिक माहिती घेतली असता कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण तपासणी व उपचाराची जबाबदारी सोपविलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असताना त्याला अन्य निगेटिव्ह युवकांसोबत सोडल्याची चर्चा आहे. तो गावी पोहोचल्यावर कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या संपर्कात आल्याने संपूर्ण गाव दहशतीत वावरत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कातील अन्य नागरिकांचा शोध घेतला जात असून गावात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी बेजबाबदारपणाचे धोरण अवलंबिणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी जनतेत केली जात आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)