जेवणाचे बिल मागितल्याने वाद, तरुण गंभीर जखमी; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

चेतन देशमुख
Tuesday, 27 October 2020

भरदुपारी आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी चांगलीच गर्दी उसळली होती. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पवन सोनोनकर याला उपचारासाठी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

यवतमाळ : जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (ता.24) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास किन्ही गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पवन प्रभाकर सोनोनकर (वय 21), असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याचा ढाबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित गौरव मानेकर याने गैरकायद्याची मंडळी गोळा करून तरुणाला आर्णी ते यवतमाळ रोडवरील किन्ही गावाजवळील क्रशर खदाणसमोर अडविले. जेवणाचे बिल का मागितले, असा जाब विचारत चाकूने व लाथाबुक्‍क्‍यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने तरुणाला गंभीर जखमी केले.

हेही वाचा - वाघोबा लपलेय कुठे? ड्रोन; स्निफर डॉगची मदत घेऊनही सापडेना, कर्मचारी हतबल

भरदुपारी आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी चांगलीच गर्दी उसळली होती. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पवन सोनोनकर याला उपचारासाठी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी रोहिज राजेंद्र भोपळे (वय 18, रा. भांबराजा) याने ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गौरव मानेकर (वय 20, रा. यवतमाळ) याच्यासह अन्य सहाजणांविरुद्घ गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth beaten by seven people in yavatmal