प्यार मे जियेंगे मर जायेंगे... प्रेमकहाणीचा करुण अंत! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

एकाच गावातील युवक-युवती एकमेकांचा प्रेमात पडले. प्रेमाचा आणाभाका घेत फिरायला जात होते. मात्र, त्यांच्या प्रेमाला नजर लागली. कुणीतरी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली. घरच्यांनी मुलाला घरी बोलावून मारहाण केली. सर्वांसमोर मारहाण झाल्यामुळे मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि प्रेमकहाणीचा करुण अंत झाला...

अमरावती : दर्यापूर तालुक्‍यातील एका युवकाचे युवतीशी सुत जुळले. काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेम सुरू होते. एकमेकांच्या भेटीगाठीही वाढल्या. ते लपून बाहेर फिरायलाही जात होते. याची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. त्यांनी मुलाला घरी बोलावून मुलीपासून दूर राहण्याची तंबी दिली तसेच मारहाणही केली. मारहाण जिवारी लागल्यामुळे मुलाने सोमवारी (ता. दह) गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल उपाख्य रोहित राजू डोंगरे (वय 20 रा. आष्टी) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. 

निखिल डोंगरे हा गावातीलच युवतीशी प्रेम करायचा. तो तिला बाहेर फिरायलाही घेऊन जात होता. याची माहिती कुणीतरी मुलीच्या घरच्यांना दिली. मुलीचे एका युवकाशी प्रेम सुरू असल्यामुळे ते चिडले. त्यांनी मुलीला प्रियकरापासून दूर राहण्यास सांगितले. तसेच मुलालाही मुलीला विसरून जाण्यास सांगितले. 

हेही वाचा - Video : गाढ झोपेत होते नागपूरकर, मध्यरात्री गुंडांनी घातला धिंगाणा

मात्र, प्रेमाचे भूत डोक्‍यात शिरल्याने दोघांनीही नातेवाईकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता भेटीगाठी सुरू ठेवल्या. ते लपून बाहेर फिरायलाही जात होते. याची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. दोघेही ऐकत नसल्याने मुलीच्या घरच्यांनी मुलाला शुक्रवारी (ता. सा) घरी बोलावून बेदम मारहाण केली. सर्वांसमोर मारहाण झाल्यामुळे मुलाला अपमानित झाल्यासारखे वाटले. अपमान जिवारी लागल्यामुळे मुलाने सोमवारी (ता. दहा) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. श्‍याम पुरुषोत्त्तम डोंगरे (वय 22 रा. आष्टी) याच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी बुधवारी (ता. 12) शंकर मोहकार (40), भाऊदास मोहकार (65) व सविता शंकर मोहकार (35) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

बनावट कॉल करून बोलावले घरी

मुलीच्या एका नातेवाइकाने बनावट कॉल करून मुलीस धाक दाखविला. तसेच निखिललाही आपल्या घरी येण्यास भाग पाडले. घरी आलेल्या निखिलसोबत तिघांनी वाद घातला. त्याच्यावर सळाखीने हल्ला करून जखमी केले. यापूर्वीही प्रेमप्रकरणावरून ठार मारण्याच्या धमक्‍या संबंधितांकडून निखिलला मिळत होत्या, असा आरोप श्‍याम डोंगरे याने दर्यापूर ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. 

आत्महत्येला धमक्‍या देणारे जबाबदार

मारहाण व सततच्या धमक्‍यांमुळेच निखिलने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस धमक्‍या देणारेच जबाबदार आहे, असा आरोप श्‍याम डोंगरे यानी दर्यापूर ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीतून केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commits suicide after being beaten by a love affair

टॅग्स
टॉपिकस