जिल्हा परिषदेची चावी पुन्हा महिलेकडेच 

वीरेंद्रकुमार जोगी
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

जिल्हा परिषदेचे आरक्षणानुसार ही संधी नरखेड तालुक्‍यातील बेलोना, पारशिवनी तालुक्‍यातील टेकाडी, रामटेक तालुक्‍यातील मनसर, नागपूर तालुक्‍यातील सोनेगाव-निपानी व बेला तर भिवापूर तालुक्‍यातील नांद सर्कलमधून निवडून येणाऱ्या उमेदवारांना मिळणार आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सुमारे साडेसात वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार महिलेच्या हाती असताना पुन्हा अडीच वर्षांसाठी महिलाच अध्यक्ष होणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेवर अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून येणाऱ्या सदस्य अध्यक्षपदी विराजमान होणार असून जिल्हा परिषदेची चावी महिला अध्यक्षांच्याच हाती राहणार आहे. 

जिल्हा परिषदेचे आरक्षणानुसार ही संधी नरखेड तालुक्‍यातील बेलोना, पारशिवनी तालुक्‍यातील टेकाडी, रामटेक तालुक्‍यातील मनसर, नागपूर तालुक्‍यातील सोनेगाव-निपानी व बेला तर भिवापूर तालुक्‍यातील नांद सर्कलमधून निवडून येणाऱ्या उमेदवारांना मिळणार आहे. यापैकी टेकाडी, सोनेगाव निपानी व नांद सर्कलमध्ये हायप्रोफाईल लढत होण्याची शक्‍यता आहे. भिवापूर तालुक्‍यातील नांद जिल्हा परिषद सर्कलमधून उमरेड मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या प्रतिभा मांडवकर व जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष तक्षशीला वाघधरे यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे.

या दोन्ही उमेदवार स्थानिक नसल्या तरी त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात वजन असल्याने नांद जिल्हा परिषदेची लढत ही जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महत्त्वाची ठरू शकते. याशिवाय पारशिवनी तालुक्‍यातील टेकाडी जिल्हा परिषद सर्कलमधून साटकच्या माजी जि. प. सदस्य कल्पना शंकर चहांदे व कॉंग्रेसकडून रश्‍मी श्‍यामकुमार बर्वे यांच्यात पुन्हा एकदा लढत होण्याची शक्‍यता आहे. मागील निवडणुकीत चहांदे यांनी केवळ हजार मतांनी बर्वे यांचा पराभव केला होता.

याशिवाय भाजपकडून टेकाडीच्या सरपंच सुनीता पृथ्वीराज मेश्राम, शिवसेनेच्या वैशाली ईश्‍वरदास डेबीया यादेखील मैदानात उतरू शकतात. नागपूर ग्रामीण तालुक्‍यातून कॉंग्रेसच्या भारती पाटील, भाजपकडून अश्‍विनी भोयर किंवा ज्योत्स्ना नितनवरे यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. यात विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांना अध्यक्षपदाचा मान मिळू शकतो. 

यांचीही लागू शकते वर्णी 
याशिवाय नागपूर ग्रामीण तालुक्‍यातील बेसा जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपच्या सुनंदा नंदागवळी व कॉंग्रेसच्या ज्योती मानकर यांच्यात लढत होणार आहे. बेसामधूनच भाजपकडून पुरुषोत्तम कांबळे हे त्याच्या पत्नीसाठी प्रयत्न करीत आहेत. रामटेक तालुक्‍यातील मनसर जिल्हा परिषद सर्कलमधून मनसरच्या सरपंच योगेश्‍वरी चोखांद्रे व लक्ष्मी राजकुमार खोब्रागडे यांना शिवसेनेकडून तर कॉंग्रेसकडून दुर्गा सागर लोखंडे यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. नरखेड तालुक्‍यातील बेलोना जिल्हा परिषद सर्कलमध्ये माजी पंचायत समिती सदस्य माया मुलताईकर यांना उमेदवारीची संधी मिळू शकते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: z p election news about women