विद्यार्थ्यांनो व्हा सज्ज! चार ऑगस्टपासून होणार तुमच्या शाळा सुरू... 

श्रीकांत पेशट्टीवार
Wednesday, 29 July 2020

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात गरीब लोक राहतात. नक्षलग्रस्त भागातील बहुतांश नागरिक दारिद्रय रेषेखालीलच आहे. येथील मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकतात. पालक मुलांना मोबाईल घेऊन देऊ शकत नाही.

चंद्रपूर : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांना टाळे लागले आहे. राज्यातही हीच परिस्थिती आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार ऑगस्टपासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियमावली आणि निकष ठरविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनात राज्यात सर्वप्रथम शैक्षणिक संस्था सुरू होण्याचा मान यानिमित्ताने या जिल्ह्यांना मिळणार आहे. 

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात गरीब लोक राहतात. नक्षलग्रस्त भागातील बहुतांश नागरिक दारिद्रय रेषेखालीलच आहे. येथील मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकतात. पालक मुलांना मोबाईल घेऊन देऊ शकत नाही. तेथे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. 

अवश्य वाचा- घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल १५०० वर्षे जुनी...

त्यामुळे या शाळांतील मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. याउलट इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ऑनलाईन शिक्षणाची सोय आहे. येथे शिकणाऱ्या मुलांनाही सहज ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या शाळांमधील ऑनलाईन शिक्षणाला आमची हरकत नाही. मात्र, जिल्हा परिषदेतील शाळांच्या विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

अवश्य वाचा- तो तिला वरमाला घालायला आला, पडल्या मात्र बेड्या.... 

ज्या गावात एक महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळला नाही, तिथल्या शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नियमावली तयार केली जाईल. यात विद्यार्थ्यांना मॉस्क, शाळेचे निर्जंतुकीकरण, शारीरिक दुरी इत्यादी निकष ठरविले जाणार आहे. येत्या चार ऑगस्टपासून या दोन्ही जिल्ह्यांतील शाळा सुरू केल्या जाईल. यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ते सुद्धा सकारात्मक असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला. 

संपादन - राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Z.P. school from Chandrapur and Gadchiroli districts open from 4 August