esakal | तुकोबांचा पालखी मुक्काम वादाच्या भोवऱ्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

तुकोबांचा पालखी मुक्काम वादाच्या भोवऱ्यात 

तुकोबांचा पालखी मुक्काम वादाच्या भोवऱ्यात 

sakal_logo
By
मनोज गायकवाड

अकलूज - धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार अकलूज येथील पालखीचा मुक्काम श्री विठ्ठल मंदिराऐवजी सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात हलविण्यात आला आहे. येत्या दोन-तीन वर्षांत वाढत्या सोहळ्याला अनुरूप असे अनेक बदल करून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला एका आदर्श सोहळ्याचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी संस्थान प्रयत्नशील आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे विश्‍वस्त अभिजित महाराज मोरे यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान, अकलूजच्या मुक्कामाच्या जागेत बदल करू नये, यासाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. 

येथील श्री विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. मात्र, गेल्या सहा-सात वर्षांपासून हा मुक्काम दुसरीकडे हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. पालखी सोहळ्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकात येथील मुक्कामाचे ठिकाण श्री विठ्ठल मंदिर नमूद केले आहे. मात्र, या वर्षी सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात सोहळ्याचा मुक्काम होणार असल्याचे सोहळाप्रमुखांनी सांगितले आहे. त्यानंतर अकलूजमधील ग्रामस्थ आणि काही संघटनांनी हा मुक्काम श्री विठ्ठल मंदिरातच झाला पाहिजे यासाठी शासकीय पातळीवर निवेदने दिली आहेत. 

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन 
मयुरेश्‍वरी नवरात्रोत्सव व समाजसेवी संस्था, म्हसोबा देवालय, मयुरेश्‍वरी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामाची परंपरा आहे. लोकांच्या भावनांचा आदर करून हा सोहळा मंदिरातच मुक्कामी ठेवावा. अन्यथा याबाबत उपोषण, पालखी काळात बंद असे मार्ग अवलंबून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मंडळींनी दिला आहे. 

ग्रामसभेत ठराव 
21 जानेवारी 2016 च्या ग्रामसभेत पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची जागा बदलण्याबाबत चर्चा झाली होती. तुकाराम महाराज संस्थानचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या या ग्रामसभेत सोहळ्याचा मुक्काम श्री विठ्ठल मंदिरातच असावा, असा ठराव (ठराव क्रमांक 109) करण्यात आला होता. त्याचाही संदर्भ या निवेदनात आहे. 

मुक्काम व रिंगण एकाच जागेवर 
येथील रिंगण सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदावर होत असतो. तो सोहळा विजयसिंह मोहिते-पाटील स्टेडियममध्ये नेण्याचा सोहळाप्रमुखांचा प्रस्ताव होता. मात्र, तेथील काही कामे अपूर्ण असल्याने रिंगण सोहळा माने विद्यालयाच्या मैदानावरच होणार आहे. तर पालखीचा मुक्काम देखील माने विद्यालयातच करण्यावर सोहळा प्रमुख ठाम आहेत. 

सोहळा प्रमुखांची माहिती 
पूर्वीच्या तुलनेत सोहळ्यातील वारकरी संख्या खूप वाढली आहे. पाच हजारांचा सोहळा पाच लाखांवर गेला आहे. ज्या गावात पालखी जाते त्या गावांची लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पारंपरिक ठिकाणी पालखी सोहळ्याला अडचणीतून मार्गक्रमण करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या सोहळ्याचा विचार करता पालखी मार्गावरील अडचणीची मुक्कामाची ठिकाणे आणि दुपारच्या विसाव्याची ठिकाणे बदलण्याचा निर्णय तुकाराम महाराज संस्थानच्या विश्‍वस्तांनी घेतला आहे. येत्या दोन-तीन वर्षांत अशी अडचणीची वाटणारी अनेक ठिकाणे बदलली जाणार आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, मुक्कामाचे ठिकाण बदलले असले तरी सोहळा दुसऱ्या गावी गेलेला नाही. तो अकलूजमध्येच असणार आहे. जागा बदलण्यामागे सुरक्षिततेचा प्रश्‍न आहे. 

पालखी मुक्काम विठ्ठल मंदिरातच असावा याबाबत ग्रामसभेचा ठराव झाला आहे. सोहळ्याच्या वेळापत्रकात मुक्कामाचे ठिकाण विठ्ठल मंदिर आहे. मुक्कामाचे ठिकाण बदलण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिरातच पालखी मुक्काम झाला पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 
- रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, म्हसोबा देवस्थान