दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी ठेवा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 June 2017

प्रस्थानासाठी दिंडीकऱ्यांना सूचना; पोलिस यंत्रणा सज्ज

आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादिवशी (ता. १७) चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी समाधी मंदिरात प्रवेशाच्या वेळी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. याबाबत सूचना दिंडीकऱ्यांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, वारीसाठी मंदिर परिसर आणि इंद्रायणी काठावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.

आषाढी वारीच्या तयारीबाबत गायकवाड यांनी सांगितले की, आळंदीत उद्यापासून (ता. १४) राज्यभरातून वारकरी येऊ लागतील. वाहतूक नियोजनाबरोबरच मंदिर परिसरात यात्रा काळात तसेच प्रस्थान काळात चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी पोलिस विशेष काळजी घेणार आहेत. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक पालिकेच्या प्रशासनाबरोबर दिले जाणार आहे. मंदिरात आणि दर्शनबारी, इंद्रायणी काठावर पोलिसांचा जादा बंदोबस्त असेल. महिलांची छेडछाड, तसेच आणि चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. बाँबसारख्या घातक वस्तूंचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक असून १६ जूनपासून शहरातील प्रमुख ठिकाणांची तपासणी केली जाईल. मंदिरात प्रवेश करताना धातूशोधक यंत्रणेने तपासणी केली जाईल.

‘वारीसाठी पाचशे पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे पाचशे कार्यकर्ते, ८५ अधिकारी नेमण्यात आले आहेत. याशिवाय चौकाचौकांत टेहाळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा लावली असून, संशयित व्यक्ती आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. प्रस्थान काळात मंदिराकडे येणाऱ्या हजेरी मारुती चौक, पालिका चौक या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त अधिक राहील. याशिवाय खासगी स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे.

रविवारी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग
पालखी पुण्याकडे मार्गस्थ होताना १८ जूनला दिंडीकऱ्यांची वाहने सोहळ्याबरोबर न सोडता पहाटे मरकळ रस्त्याने लोणीकंदमार्गे विश्रांतवाडीला सोडली जाईल. केळगाव, चिंबळी, भोसरी, दिघीमार्गे विश्रांतवाडी असाही मार्ग केला असून, दिंडीप्रमुखांना सूचना दिल्या जातील. दिशादर्शक फलकही लावले जातील. याशिवाय आळंदीला येणारी औद्योगिक वाहतूक या दिवशी दुपारी चारपर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात येणार असल्याचे नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alandi news Keep the number of Warkaris in the dindi