अलंकापुरी भक्तिमय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 June 2017

आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या शनिवारी (ता. १७) होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक व दिंड्या आळंदीत दाखल झाले आहेत. धर्मशाळा, राहूट्यांमधून अभंगाच्या सुरावटीने अवघी अलंकापुरी भक्तिमय झाली आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देऊळवाडा, पोलिस आणि पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या शनिवारी (ता. १७) होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक व दिंड्या आळंदीत दाखल झाले आहेत. धर्मशाळा, राहूट्यांमधून अभंगाच्या सुरावटीने अवघी अलंकापुरी भक्तिमय झाली आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देऊळवाडा, पोलिस आणि पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान... ही भावना उरी ठेवून आलेल्या भाविकांचे शहरातून ठिकठिकाणी भजन, कीर्तन आणि अभंगाचे स्वर कानी ऐकू येत आहे. उद्याचा पालखी प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी तीन दिवस आधीच भाविक आळंदीत दाखल झाले. डोक्‍यावर तुळस, खांद्यावर भगवा झेंडा, गळ्यात तुळशीच्या माळा घालून आलेल्या भाविकांच्या मांदियाळीने अवघी आळंदी गजबजून गेली आहे. आजही गावोगावच्या दिंड्या आळंदीत येत होत्या. भाविकांची सकाळपासूनच इंद्रायणी तीरी स्नानासाठी गर्दी झाली होती. स्नानानंतर भाविक दर्शनासाठी माउली मंदिरात गर्दी करत होते. सकाळपासूनच दर्शनमंडप भाविकांच्या गर्दीने भरून गेला होता.  

दर्शनबारीत ‘माउली माउली’ नामाचा गजर होत होता. देऊळवाड्यात महिलांचे फेर, फुगड्या आणि खेळ सुरू होते. दुसरीकडे भाविकांच्या महापूजा सुरू होत्या. भाविक वारकऱ्यांच्या दिंड्यांच्या नगरप्रदक्षिणा सुरू होत्या. ठिकठिकाणी शहरात भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. दरम्यान, आज शहरात आणि मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त होता.

मानाच्या बैलजोडीची मिरवणूक 
माउलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या मानाच्या बैलांची आज सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. आज चिताळकर यांच्या बैलजोडीची गोपाळपुरातील नृसिंह स्वामी मठ ते माउलींच्या समाधी मंदिरापर्यंत प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी सोहळाप्रमुख डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर यांच्या हस्ते मानाच्या बैलजोडीची महाद्वारात पूजन करण्यात आले. 

पहाटे चार वाजता घंटानाद आणि समाधीवर पवमान अभिषेक.
पहाटे पाचपासून भाविकांच्या पूजा आणि समाधी दर्शन.
दुपारी बारा ते साडेबारा समाधी दर्शन बंद आणि गाभारा स्वच्छता. श्रींना नैवेद्य.
साडेबारा ते दोन दर्शन.
दोननंतर भाविकांचे दर्शनबंद.
अडीच वाजता मानाच्या दिंड्यांना प्रस्थानसाठी प्रवेश.
चार ते सहा मुख्य प्रस्थान.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alandi pune news sant dnyaneshwar maharaj palkhi sohala