
पंढरपूर : ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये नोकरीच्या निमित्ताने गेल्या तीस वर्षांपासून स्थायिक झालेल्या पाच वारकऱ्यांना पंढरीच्या आषाढी वारीने भुरळ पाडली. ते वारी सुरू होण्याच्या चार दिवस आधीच आळंदीत येऊन वारीबाबतची माहिती घेऊन वारीत प्रत्यक्ष सहभागी झाले आणि वारीच्या आत्मिक परमानंदाचा अनुभव घेत त्यांनी पायी वारी विठुरायाच्या चरणी शनिवारी रुजू केली. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी आणि पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघताना त्यांच्या आसवांना भक्तिसुखाचा पूर आला. पंढरीची वारी हे पृथ्वीवरचे अद्भुत आध्यात्मिक विद्यापीठ असून त्यात भक्तीसुखाची प्रचिती येते, अशी भावना त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.