आम्हा अनाथाकारणे। पंढरी निर्माण केली देवे।।

देव, संत, ऋषीमुनी, सनकादिक वारी करतात. देवाचा आणि भक्ताचा अलौकिक प्रेमसंबंध म्हणजे पंढरपूरची वारी
Ashadhi wari 2022 Pandhari Wari Saint Tukaram Maharaj Pandharpur Wari
Ashadhi wari 2022 Pandhari Wari Saint Tukaram Maharaj Pandharpur Warisakal
Summary

संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या वारीचा सर्वांना आग्रह धरलेला आहे. काय आहे या पंढरीच्या वारीचे औत्सुक्य हे जाणून घेतले पाहिजे. देव, संत, ऋषीमुनी, सनकादिक वारी करतात. देवाचा आणि भक्ताचा अलौकिक प्रेमसंबंध म्हणजे पंढरपूरची वारी.

संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या वारीचा सर्वांना आग्रह धरलेला आहे. काय आहे या पंढरीच्या वारीचे औत्सुक्य हे जाणून घेतले पाहिजे. देव, संत, ऋषीमुनी, सनकादिक वारी करतात. देवाचा आणि भक्ताचा अलौकिक प्रेमसंबंध म्हणजे पंढरपूरची वारी. अलौकिक म्हणजे सामान्य माणसाच्या कळण्याच्या पलीकडचा हा वारी सोहळा आहे. आषाढ महिना शेतकऱ्यांच्या पेरणी करण्याचा काळ असला, तरी हा वारकरी पंढरीच्या दिशेने जात असतो. साहित्यामध्ये भक्ती संबंधाने आलेले उदाहरण सांगायचे झाल्यास देव आणि भक्त या नात्याला एक उपमा आहे, ती म्हणजे कमळ आणि भ्रमराची. कमळ सुर्योदयाला उमलते आणि दुपारनंतर आकुंचन पावते. हा भ्रमर मकरंदाच्या सेवनाच्या आवडीने जातो. परागसेवन करताना भान राहात नाही. सुर्यास्ताला पाकळ्या बंद होतात. भ्रमराला बाहेर येणे शक्य असूनही त्या कमळाचा नाश करून ते बाहेर येत नाही. का तर कमळावर प्रेम आहे. देव आणि भक्त यांच्याकरीता भगवंत हे कमळ आणि भक्त हा भ्रमर अडकून जातो आणि प्रतिवर्षी वारीसाठी येतो. ऊन, वारा, पाऊस याचा कसलाही विचार करत नाही. येथे कधी देवही भ्रमर होतो आणि भक्तांच्या हृदयात (कमलात) बसतो. संत जनाबाई वर्णन करतात...

हृदयीबंदी खाना केला । आत विठ्ठल कोंडीला ।।

हा परस्पर प्रेमाचा संबंध म्हणजे पंढरीची वारी. भक्ताला देवाला भेटण्याची आणि देवालाही आपल्या भक्ताला भेटण्याची तितकीच ओढ आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवान म्हणतात

आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ।।

येथे देवभक्ताच्या भेटीसाठी उभा आहे.

वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उताविळ ।।

आणि भक्ताच्या अंत:करणात देखील देवाच्या भेटीची अत्यंत तळमळ दिसून येते.

जावे पंढरीशी आवडे मनासी । कधी एकादशी आषाढी हे ।।

व्यावहारिक जीवनातील उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या सासुरवाशिनीला दिवाळीचा सण आला की माहेरची ओढ लागते, महाराज वर्णन करतात...

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ।।

तसे आषाढी एकादशी आली की भक्ताच्या मनामध्ये भगवंताच्या भेटीची ओढ लागते. वारी करणारा सांप्रदाय जगाच्या पाठीवरचा जिवंत सांप्रदाय आहे. या सांप्रदायात देव आहे, तीर्थ आहे, संत आहेत, ग्रंथ आहेत, साधना आहे. वारकरी सांप्रदायाला देव आहे सामान्य देव नसून दैवत आहे. देवही ज्याची आराधना करतात असे दैवत आहे. एके ठिकाणी संत तुकाराम महाराज सुखाच्या सागराची उपमा देतात

सुखाचा सागर उभा विटेवरी । कृपादान करी तोची एक ।।

किंवा माऊली वर्णन करतात

सर्व सुखाचे आगर । बापरुख्मादेवीवर ।।

वाळवंटापासून महाद्वारापर्यंत या देवतेच्या दर्शनाला दाटी राहते. या सांप्रदायाचे देवतीर्थ म्हणजे पंढरी आहे. याठिकाणी प्राचीन अर्वाचिन सर्व संतांना आकृष्ट केले आहे. याठिकाणी शंकराचार्य पण आले. आचार्यांनी याठिकाणाला महायोगपीठ म्हणून वर्णन केले आहे.

अशा या पंढरीक्षेत्राचं माहात्म्य विशेषरुपानं पहायचे झाले तर

आधि रचीली पंढरी । मग वैकुंठनगरी ।।

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।।

असे पहावयास मिळते. नुसती डोळ्याने पंढरी पाहिली तर सर्व पापांचा नाश होतो, असे या क्षेत्राचे महत्त्व आहे. संत तुकाराम महाराज याचे वर्णन आपल्या अभंगात करतात

अवघीच पापे गेली दिगंतरी । वैकुंठ पंढरी देखिलीया ।।

किंवा वाचेने पंढरी पंढरी उच्चार केला तरी पापाचा नाश होतो.

पंढरी पंढरी म्हणता । होय पापाची बोहरी ।।

अशा प्रकारे या पंढरपूर क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे.

पंढरपूरला चंद्रभागेसारखे तीर्थ आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात..

ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ।।

चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली तर सर्व तीर्थाचे दर्शन होते.

अवघीच तीर्थे घडली एकवेळा । चंद्रभागा डोळा देखिलीया ।।

कारण सर्वतीर्थ हे स्वत: पवित्र होण्यासाठी दररोज माध्यान्हकाळी चंद्रभागेचे स्नान करतात. संत तुकाराम महाराज त्याचे वर्णन

शंकरसांगे ऋषीजवळी । सकळ तीर्थे माध्यान्ह काळी ।।

येती पुंडलिका जवळी । करीती अंघोळी वंदीती चरण ।। असे करतात.

संतांचा विचार केला तर पंढरीमध्ये पुंडलिकरायासारखे संत आहेत. ज्यांनी आपल्या मातापित्याच्या निकट सेवेमुळे प्रत्यक्ष भगवंताला खेचून आणले

पुंडलिकाच्या निकट सेवे । कैसा धावे बराडी ।।

पुंडलिकाची सेवा पाहून भगवंत बराडी म्हणजे आमंत्रणाविना पंढरपूरला आले. म्हणून पुंडलिकरायाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत.

अवघीया संता एकवेळा भेटी । पुंडलिक दृष्टी देखिलीया ।।

भक्त पुंडलिकाला डोळ्याने पाहिले तर सर्व संतांचे दर्शन होते.

ऐसे संतजन ऐसे हरीदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।।

पंढरीमध्ये संतांचा भार आहे. संतजनाबाई वर्णन करतात

संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत ।। वारकऱ्यांचे व्रत म्हणजे व्रत एकादशी करीन उपवासी । गाईन अहर्निशी मुखीनाम ।।

एकादशीचे व्रत आणि मुखाने भगवंताचे नामस्मरण हा वारकऱ्यांचा विधी आहे. संत तुकाराम महाराज वर्णन करतात.

तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ।। किंवा कंठी मिरवा तुळसी ।। व्रत करा एकादशी ।।

हे वारकऱ्यांचे व्रत आहे. शेवटी पंढरी विषयी सांगायचे झाल्यास

तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे । पंढरी निर्माण केली देवे ।।

महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान पांडुरंगाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात भक्तांचा मेळा आहे. कोरोनामुळे पडलेल्या दोन वर्षांच्या विरहानंतर लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आसुसलेला आहे. देव आणि भक्तांचा अलौकिक प्रेमसंबंध असणाऱ्या या पंढरपूर क्षेत्राचा महिमा पाहूयात.

- डॉ. हनुमान गरुड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com