तुकोबारायांचा दळभार निमगाव केतकीत

पंढरीच्या दिशेने निघालेल्या तुकोबारायांच्या सोहळ्यात आजच्या वाटचालीत आकाशात काळ्या ढगांची दाटी, तर उन्हाची तीव्रता वाढली होती.
 Ashadi wari 2022 sant tukaram maharaj palkhi at Nimgaon Ketki indapur
Ashadi wari 2022 sant tukaram maharaj palkhi at Nimgaon Ketki indapur sakal

निमगाव केतकी : पंढरीच्या दिशेने निघालेल्या तुकोबारायांच्या सोहळ्यात आजच्या वाटचालीत आकाशात काळ्या ढगांची दाटी, तर उन्हाची तीव्रता वाढली होती. शिवाय, माळरान परिसर रस्त्यालगत कमी झाडे असल्याने उकाडा जाणवत होता. या सर्वांची तमा न बाळगता हरिनामात दंग झालेले वैष्णव निमगाव केतकीच्या शेतशिवारात विसावला.

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं ।

विठाई जननी भेटे केव्हां ॥

असा भाव मनी घेऊन पालखी रोज एक-एक टप्पा पार करीत आहे. अंथुर्णे गावात रात्री कीर्तन मसलेकर दिंडीच्या वतीने झाले, तर कानसुरकर दिंडीचा जागर झाला. ग्रामस्थांच्या वतीने पहाटे अभिषेक होऊन सोहळा मार्गस्थ झाला. दळवी वस्तीमार्गे सोहळा शेळगाव फाट्यावर पोचला. शेळगाव येथे तीनशे वर्षांपूर्वी संत मुक्ताबाई यांनी जिवंत समाधी घेतली आहे. त्यांना विठ्ठलभक्तीचे वेड होते. गावात पंढरपूरप्रमाणेच विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. इंदापूर तालुका अन् परिसरात या गावाला ‘धाकटे पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. येथून वारकऱ्यांनी दर्शन घेत वाटचाल पुढे सुरू ठेवली.

दुपारच्या जेवणानंतर सोहळा निमगाव केतकीकडे मार्गस्थ झाला. सवंदडीच्या माळरानावर वारकरी दगडांची उतरंड (लघोर) लावत होते. या उतरंडीने बारा महिन्यांची पंढरपूर- देहू-आळंदीची वारी पूर्ण होते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. पानवेलीच्या शेतीचे माहेरघर असलेल्या निमगाव केतकीमध्ये संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोचला. समाजआरतीनंतर सोहळा विसावला. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच, मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले. देशमुख दिंडीचे कीर्तन, तर हटकळे दिंडीकडून जागर झाला.

इंदापूरला आज दुसरे रिंगण

निमगाव केतकी येथून सोहळा उद्या इंदापूरकडे मार्गस्थ होणार असून, दहा वाजता न्यू-इंग्लिश स्कूलच्या मैदानावर दुसरे गोल रिंगण होणार आहे, असे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे देहूकर यांनी सांगितले.

कोरोनाकाळात दोन वर्षे वारी चुकल्याने वाईट वाटले. त्यामुळे कधी एकदा पंढरपूरला जाते असे झाले होते. यंदा वारी होत आहे, त्यामुळे मनाला समाधान आहे. वारीसारखे सुख त्रिभुवनात नाही.

- लीलाबाई पंढरीनाथ मिस्त्री, संगमनेर, नगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com