esakal | माउलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान
sakal

बोलून बातमी शोधा

माउलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान

माउलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळंदी (पुणे): संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवारी (ता. 17) दुपारी चारनंतर आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. त्या दिवशी पालखी देवस्थानच्या नव्या दर्शनमंडपात मुक्कामी विसावणार आहे. रविवारी (ता. 18) सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी देवस्थान सज्ज झाले आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची सोय केली आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. संपर्कासाठी वॉकीटॉकी कर्मचाऱ्यांकडे देण्यात आल्या आहेत. प्रस्थान सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

शनिवारी पहाटे चार वाजता देऊळवाड्यात घंटानाद आणि काकडा आरती झाल्यानंतर माउलींच्या समाधीवर पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती केली जाणार आहे. पाच वाजता भाविकांच्या महापूजा आणि समाधी दर्शन सुरू राहील. सकाळी नऊ ते अकरा वीणा मंडपात कीर्तनाचा कार्यक्रम होईल. बारा ते साडेबारा या काळात समाधी मंदिर, गाभारा स्वच्छ केला जाईल. त्यानंतर श्रींना नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. या काळात भाविकांचे समाधी दर्शन बंद ठेवण्यात येणार असून साडेबारा ते दोन या काळात पुन्हा दर्शन सुरू केले जाणार आहे. दुपारी दोननंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी देऊळवाडा स्वच्छ करण्यात येईल. या वेळी भाविकांचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांच्या मदतीने देवस्थानचे चोपदार अडीचच्या दरम्यान मानाच्या प्रमुख 47 दिंड्या आत घेण्यास सुरवात करतील. याच दरम्यान समाधी मंदिरात माउलींना पोषाखाचा कार्यक्रम असणार आहे. दुपारी चारनंतर पालखी प्रस्थानासाठी गुरू हैबतबाबा यांच्या वतीने माउलींची आरती होईल. त्यानंतर संस्थानच्या वतीने आरती केली जाईल. मानकऱ्यांना नारळप्रसाद वाटप होईल. त्यानंतर वीणामंडपात ठेवलेल्या पालखीमध्ये माउलींच्या पादुका ठेवण्यात येतील. संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप केले जाईल. गुरू हैबतबाबांच्या वतीने दिंडीप्रमुख, मानकऱ्यांना नारळप्रसाद दिला जाईल. त्यानंतर समाधीजवळ संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद दिला जाणार आहे. या कार्यक्रमानंतर वीणा मंडपातील माउलींची पालखी आळंदीकर मंडपाबाहेर आणून मंदिर प्रदक्षिणा करून देऊळवाड्याबाहेर आणतील. प्रदक्षिणा मार्गावर भैरोबा चौक, हजेरी मारुती चौक, चावडी चौक आणि महाद्वारातून पालखी देवस्थानच्या नव्या दर्शन मंडपात विसावेल. याठिकाणी समाज आरती होईल. रात्री अकरा ते पहाटे साडेचार जागराचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.

मशागतीच्या कामांमुळे गर्दी कमी
यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावली. मात्र शेतकऱ्यांचा संप नुकताच झाला. त्यामुळे शेतीची कामे बहुतांश भागात रखडली होती. आता पाऊस चांगला झाल्याने ठिकठिकाणी पूर्वमशागतीची कामे सुरू झाली आहेत. यामुळे सध्या आळंदीत भाविकांची गर्दी कमी जाणवत आहे. यंदाच्या वारीवर शेतकऱ्यांच्या संपाचे सावट असेल, याची चर्चा आहे. मात्र सासवडनंतर जेजुरीकडे मार्गस्थ होताना आणि लोणंदहून पालखी पुढे जाताना वारकऱ्यांची संख्या वाढेल. फलटणनंतर पुन्हा तिसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने भाविक वारकरी सहभागी होतील. जशीजशी शेतीची कामे उरकतील तशी वारकऱ्यांची संख्या वाढेल, अशी चर्चा सध्या वारकऱ्यांमधून होत आहे.