वारीत प्रबोधन लई भारी...

(शब्दांकन : विलास काटे)
Thursday, 29 June 2017

सोहळ्यात आज 
दुपारचे जेवण - मांडवी ओढा येथे
सोहळ्यातील पहिले गोल रिंगण - पुरंदवडेत
दुपारचा विसावा - येळीव 
रात्रीचा मुक्काम - माळशिरस

दीपक श्रोत्रीय,दांडेकर पूल, पानमळा, पुणे
पंढरीच्या वाटेवर हरिनामात दंग असलेले वारकरी आता स्वयंप्रेरणेने स्वच्छता आणि आरोग्याचा जागर कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून करू लागले आहेत, ही गोष्ट नक्कीच सुखावह आहे. पूर्वीपेक्षा आता सोहळ्यात सरकारच्या खांद्याला खांदा लावून प्रबोधन करण्यात वारकरी स्वयंसेवकांचाही वाटा वाढला आहे. हे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यावर प्रकर्षाने जाणवले.

मी अनेक वर्षांपासून वारी करतो. वारीत पूर्वी साधने नव्हती. वारकऱ्यांची संख्याही तुलनेने कमी होती. आता समाज वाढल्याने सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्याही वाढली. यंत्रणा हाताबाहेर गेली. मात्र, वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि समाज प्रबोधनासाठी झटणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आज सकाळी पहाटे पूजा झाल्यानंतर बरडच्या तळावरून माउलींचा पालखी सोहळा पुढे निघाला. माउलींच्या सोहळ्यात चालताना अभंगाचे क्रम ठरलेले आहेत. काकडा, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, हरिपाठ असे अभंग वारीच्या वाटेवर म्हटले जातात. त्यांना टाळ-मृदंगाची साथ मिळते आहे. कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून जागोजागी समाजप्रबोधन होत आहे. यात वेगाने वाढ होत आहे. बरडहून पुढे चालत आल्यावर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात अर्थात धर्मपुरीत सकाळी साडेअकराच्या सुमारास पोचला. 

धर्मपुरीत तोफांच्या सलामी आणि रांगोळ्यांच्या पायघड्यांनी स्वागत झाले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक मंत्री, मान्यवर मंडळी स्वागतासाठी आले होते. मानकऱ्यांचा सोलापूरकरांकडून सन्मान झाला. एकेक दिंड्या दुपारच्या जेवणासाठी सरकू लागल्या. सोलापूरच्या कलापथकाकडून आरोग्य, लेक वाचवा, स्वच्छता अभियान यांसारखे संदेश भारुडांच्या माध्यमातून दिले जात होते. सरकारी यंत्रणेद्वारेही तन्मयतेने प्रबोधन केले जात होते. या यंत्रणेला समांतर वारकरी संप्रदायही वारीच्या वाटेवर भारुडांच्या माध्यमातून समाजव्यवस्था आणि विसंगत चालीरीतींच्या बदलासाठी हाक देताना दिसत आहे. आता वारीत तरुणाईही समाविष्ट झाली आहे. ठिकठिकाणी स्वयंसेवक रुग्णवाहिका सेवा, औषध वाटप करताना दिसत होते. स्वच्छतेसाठी प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छतागृहांच्या वापरासाठी प्रबोधन केले जात होते. एकंदर वारीत, ‘मार्ग दाऊनी गेले आधी, दयानिधी संत ते,’ या अभंगाचा प्रत्यय पदोपदी येतो आहे. संतांनी समाजप्रबोधनाचा दाखविलेला मार्ग आजही अमलात आणून माउलीनामात दंग झालेले वारकरी स्वच्छतेत मागे नाहीत, हेच अधोरेखित होत आहे. दुपारी धर्मपुरीतील जेवण उरकल्यानंतर पालखी सोहळा सायंकाळी नातेपुते येथे पालखीतळावर विसावला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017