...अवघा झालासे आनंद!

(शब्दांकन - विलास काटे)
Friday, 30 June 2017

सोहळ्यात आज 
सकाळी खुडूस फाट्यावर नऊ वाजता दुसरे गोल रिंगण.
दुपारी निमगाव पाटीला जेवणासाठी विसावा.
सायंकाळी चारला धावा धावा.
साडेचारला वेळापूरच्या माळावर भारूड.
सायंकाळी वेळापूरला मुक्काम.

रजनी पैलवान, पुणे
भल्या पहाटे नातेपुत्याहून निघताना वरुणराजाच्या शिडकाव्याने आम्ही चिंब झालो. आजचे आकर्षण असलेल्या गोल रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी मनात कमालीची उत्सुकता दाटली होती. पुरंदावड्याच्या प्रशस्त मैदानात माउलींच्या आणि स्वाराच्या अश्वांनी नेत्रदीपक दौड घेऊन दोन फेऱ्या पूर्ण केल्या अन्‌ मन आनंदाने भरून आले. रिंगणानंतर वारकऱ्यांनी देहभान हरपून केलेला उडीचा खेळ पाहून भक्ती कशाला म्हणतात, याची प्रचिती आली. माझ्यासह साऱ्याच वारकऱ्यांमध्ये ‘भाग गेला, शीण गेला, अवघा झालासे आनंद अशीच स्थिती झाली होती. 

नातेपुत्यात बुधवारी रात्री मुक्काम केल्यावर राहूट्यांमध्ये गुरुवारच्याच रिंगणाची चर्चा होती. कधी सकाळी लवकर उठून रिंगण पाहतो, असे आम्हाला झाले होते. सकाळी माउलींच्या तंबूत पवमान पूजा झाली आणि विणेकऱ्यांच्या हजेरीनंतर पालखी रथात ठेवण्यात आली. सोहळा सकाळच्या न्याहारीसाठी मांडवी गावाकडे निघाला. वाटचाल सुरू होताच पावसाच्या हलक्‍याशा सरी बरसू लागल्या. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेने पावसात वारकरी भिजून चिंब झाले. मांडवीत विद्यार्थी, शिक्षक भाकरी आणि पिठलं घेऊन स्वागतासाठी तयार होते. मधूनच बुंदीचे वाटप सुरू होते. मांडवीतील न्याहारीनंतर वारकऱ्यांची लगबग सुरू झाली, ती रिंगण पाहण्यासाठी. पावले त्या दिशेने पडू लागली. सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे होणारे होते. येथील प्रशस्त मैदानात एकेक करून दिंड्या आणि पताकाधारी चोपदार सोडत होते. शिस्तीचा सोहळा अनुभवताना धन्य वाटले. सव्वाएकला माउलींची पालखी रिंगणाच्या मध्यभागी आली. माउलींच्या अश्वाला रिंगण दाखविण्यात आले. नंतर स्वाराच्या अश्वामागे माउलींचा अश्व धावू लागला. ‘माउली माउली’चा गजर होत होता. माउलींच्या अश्वाने स्वाराच्या अश्वाला मागे टाकत दोन फेऱ्या पूर्ण केल्या आणि गोल रिंगण डोळ्यांनी टिपले. भाविकांनी रिंगणात धाव घेत अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावली. मीही भक्तिभावाने अनुकरण केले. त्यानंतर उडीचा खेळ सुरू झाला. टाळमृदंगाचा नादमय स्वर आणि वारकऱ्यांचे विविध खेळ पाहिले. महिला आणि पुरुष एकरूप होत माउली माउलीच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. दिवसभरात वारकरी भक्तिरसात न्हाऊन गेले आणि सायंकाळी माळशिरसला मुक्कामी विसावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017