लागला टकळा पंढरीचा...!

(शब्दांकन : विलास काटे)
Sunday, 2 July 2017

सोहळ्यात आज 
दुपारी सोहळा वाखरीकडे मार्गस्थ होणार
बाजीरावची विहीर येथे सोहळ्यातील दुसरे उभे रिंगण होणार
बाजीरावची विहीर येथे सोहळ्यातील चौथे गोल रिंगण होणार

हिरामण मोरे, नंदुरबार
गोल रिंगणाबरोबर सायंकाळी संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव या दोन संतांच्या बंधूभेटीच्या प्रसंगाने सातशे वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. क्षणभर डोळ्यांच्या कडा पाणावल्या; पण माउलींसगे विठूनामाचे गोडवे गाताना तारीख, वार विसरून सोहळ्याशी एकरूप झालो. आज गोल रिंगण, बंधूभेटीचा कार्यक्रम पाहिला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य अजान माणसालाही पंढरीच्या भक्तीचा टकळा लागला.

वेळापूरचा पाहुणचार घेतल्यानंतर आज पहाटे माउलींचा सोहळा भंडी शेगावच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाला. माउलींच्या दर्शनासाठी सकाळी पालखी तळावर पोचलो. याच वेळी सकाळी रथाला आज नवीन बैलजोडी जुंपण्यात आली. आळंदीकरांची बैलजोडी असल्याने मोठ्या भक्तिभावाने बैलांची सेवा करण्यात आळंदीकर मग्न होते. रथ तयार झाल्यानंतर माउली माउलीच्या गजरात पालखी रथात ठेवली आणि पुंडलिकावरदेचा गजर करून सोहळा पुढे मार्गस्थ झाला. अवघ्या दोन तासांच्या अंतराने पालखी सोहळा ठाकूरबुवाची समाधी येथे आला आणि तिसरे गोल रिंगण आज झाले. यानंतर वारकऱ्यांना उत्सुकता होती ती बंधूभेटीची. सासवडहून निघालेले संत सोपानदेव आणि आळंदीहून निघालेले संत ज्ञानेश्वर महाराज या दोन संतांच्या भेटीचा प्रसंग अनुभवण्यासाठी आज दुपारपासूनच भाविक पंढरपूर तालुक्‍याच्या प्रवेशाजवळ टप्पा येथे बसून होते. दरम्यानच्या काळात संत तुकाराम महाराज, संत गवरशेठ वाणी, संताजी महाराज जगनाडे या संतांच्या पालख्यांचेही दर्शन झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. अखेर बंधूभेटीची वेळ आली. रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या आणि तोफांची सलामी देण्यात आली. माउलींची पालखी टप्पा येथे येऊन थांबली. त्यानंतर संत सोपानदेवांची पालखी आली. दोन्ही पालख्यांचे रथ शेजारी उभे केल्यावर उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात माउली माउलीचा गजर केला. मानकऱ्यांनी एकमेकांना नारळ प्रसाद दिल्यानंतर सोहळा पुढे भंडी शेगावच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागला; मात्र या प्रसंगाने सातशे वर्षांपूर्वीच्या दोन भावंडांचा जीवनपट नजरेसमोर तरळला. 

खरे तर वारीत चालताना तारीख, वार विसरायला होते. वारीतील हा अनुभव प्रत्येकाला आषाढी वारी केव्हा येईल, याची उत्सुकता देऊन जातो. म्हणूनच माझ्यासारखा वारकरी ‘संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा’ असे म्हणून पुन्हा वारीत दाखल होण्यासाठी आतुर असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017